(नवी दिल्ली)
वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. 15 फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत एक्स्प्रेस भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आली. वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रती तास 100 किमी वेग आणि आरामदायी प्रवास ही खास वैशिष्ट्य प्रवाशांना चांगलीच पसंतीस पडली आहेत. त्यानंतर आता सरकार वंदे भारत मेट्रोही आणणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वंदे भारत मेट्रोची पहिली झलक समोर आली आहे. पंजाबच्या कपरूथलामध्ये असलेल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत वंदे भारत मेट्रोचं काम सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या वंदे भारत मेट्रोची ट्रायल रन जुलै 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. वंदे भारत मेट्रोमुळे रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवासाबरोबरच कमी किंमतीत वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. वंदे भारत मेट्रो इंटर सिटी आणि इंट्रा सीटीदरम्यान धावणार आहे.
वंदे भारत मेट्रो कमीत कमी 12 डब्यांची असेल. प्रत्येक डबा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. प्रवाशांच्या प्रतिक्रिया, गर्दी आणि मागणीच्या आधारावर मेट्रोच्या डब्यात वाढ केली जाणार आहे. जास्तीत जास्त 16 डब्यांपर्यंत वाढ करणं शक्य होणार आहे. कमी वेळेत जास्त अंतर कापण्याचं या मेट्रोचं उद्दीष्ट्य असणार आहे. चाचणीनंतर देशभरात मेट्रो लाँच केली जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणेच वंदे भारत मेट्रोही पांढऱ्या आणि भगव्या रंगात असण्याची शक्यता आहे.