(नाणीज / वार्ताहर)
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आम्हा नेत्यांना एक उर्जा मिळालेली आहे. या सत्कारामुळे एक जबाबदारी आमच्यावर आली आहे. त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जगद्गुरूश्री अध्यात्माचे कार्य जगासमोर पोहोचवत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे, आसा गौरव कोकणच्या विकासात महत्वाचा वाटा उचललेल्या नेत्यांनी आज येथे केला.
आज संतशिरोमणी गजानन महाराज व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या जयंतीनिमित्तच्या वारी उत्सवात जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व नेत्यांनी ही भूमिका मांडली. सत्कारमूर्तीत उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरविकास मंत्री नितेश राणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरणभैया सामंत, आमदार शेखर निकम व सौ. निकम, रत्नागिरी टाईम्सचे मालक उल्हासराव घोसाळकर यांचा समावेश होता. यावेळी संतपीठावर प.पू. कानिफनाथ महाराज उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना
मंत्री शेखर निकम म्हणाले, “गेली ३५ वर्षे मी स्वामीजींच्या बरोबर आहे. संस्थानचे मोठे ऋण आम्हा निकम कुटुंबार आहेत. त्याबाबत मी कृतज्ञ आहे. स्वामीजींचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करु.”
आमदार भास्कर जाधव म्हणाले, “येथे आमचा सत्कार होणे भाग्याचा दिवस आहे. हिंदूत्वाच्या विचाराचे वारदार महाराज आहेत. ते अध्यात्माचा वारसा जगासमोर पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत व पुढेही करतील. प्रभू रामचंद्रांनी खारीचा सत्कार केला. आजचा आमच्या रामानंदाचार्यांनी केलेला सत्कारही त्याच तोलामोलाचा आहे. माझ्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही की चारित्र्यावर शिंतोडो नाहीत. आयुष्यात पुढेही निष्कलंक राहण्याचे बळ मिळो. ”
मंत्री योगेश कदम म्हणाले, “माझ्यासारख्या तरूणाचा सत्कार येथे केला त्याबद्दल मी ऋणी आहे. मी स्वतःला नशिबवान समजतो की, महाराष्ट्रासाठी कार्य करण्याची उर्जा येथे मिळाली. राज्य शासन व्यसनापासून तरुणांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सरकार आपल्या जबाबदारीत कमी पडणार नाही. माझा हिंदू धर्मात जन्म झाला त्याचा अभिमान आहे. प.पू. कानिफनाथ महाराज सातासमुद्रापलीकडे जाऊन धर्म प्रसार करीत आहेत त्यांचाही अभिमान आहे.”
मंत्री नितेश राणे म्हणाले, “जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज लोकांच्या आयुष्यात परिवर्तनाचे काम करीत आहेत ते प्रेरणादाई आहे. मी स्वतः हिंदू आहे. माझ्या जन्म व मृत्यू दाखल्यावर हिंदूच उल्लेख राहील. शेजारच्या मुस्लिम राष्ट्राकडून होणारे होणारे अतिक्रमण थोपवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. महाराजांचे घरवापसीचे कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे. सरकारचे धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मत्स्यउत्पादन व रोजगार वाढवणे, सागरी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवणे, जिहादी मुक्त करण्याचे काम करणार आहे. तुम्ही टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी अशा कार्यक्रमाने उर्जा वाढते. आपली सुरक्षा करणे, काळजी घेणे आमची जबाबदारी आहे. सुदैवाने हिंदू समाजाला विश्वास देणारे सरकार आले आहे. सनातन बोर्डाची स्थापना करून बक्फ बोर्डाने लाटलेल्या हिंदूच्या जमिनी राखण्यासाठी प्रयत्न करू.”
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या प्रतिसादात महाराजांचा वाटा महत्वाचा आहे. कारण त्यांनी तिथे जाऊन बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला. त्याने हिंदू जागृत झाला. श्रद्धा व अंधश्रद्धा ही प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. महाराजांनी राबविलेले उपक्रम देहदान, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान महायज्ञ ही अंधश्रद्धा नाही. ती ख-या अर्थाने श्रद्धा आहे. मी लहानपणी महाराजांच्या घरी अभ्यास करायचो. त्यामुळे त्यावेळी उत्तीर्ण झालो. एवढेच नव्हे पुढे राजकारणातील प्रत्येक पेपर डिस्टींग्शनमध्ये पास झालो. ज्या ज्या वेळी हिंदू धर्मावर अन्याय झाला त्यावेळी त्याला वाचा फोडण्याचे काम प.पू.कानिफनाथ महाराजांनी केले आहे. महाराजांचे मोठ्या संख्येने असलेले भक्त ही त्यांची कवच कुंडले आहेत. शासन तुमच्या बरोबर आहे. शासनाला अपेक्षित काम तुम्ही करीत आहात. येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे धरण पुढच्या वर्षी पूर्ण होईल.” यावेळी किरणभैय्या सामंत यांचेही भाषण झाले.
श्री उल्हास घोसाळकर म्हणाले, “या संस्थानने संपूर्ण हिंदू धर्माची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आहे. राज्यभर संस्थानचे अनेक विधायक उपक्रम सुरू आहेत. त्यांच्या भरीव कार्याचा अभिमान आहे. महाराजांना यापुढे आणखी कार्य करण्याचे बळ मिळो. त्यांच्या हातून हिंदू धर्मासाठी भरभक्कम कार्य घडो, हीच प्रार्थना.”
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी या सत्कार सोहळ्याचा समारोप केला. त्यांनी सत्कारमूर्तीच्या कार्याची व योगदानाची ओळख करुन दिली. ते म्हणाले, “या भाग्यविधात्यांनी संस्थानचे कार्य जनसामान्यापर्यंत पोहोचवावे. या पीठावर सर्वांचेच प्रेम राहुदे. माझे सर्वांच्या कार्याला आशीर्वाद आहेत.”
प्रारंभी दीपप्रज्वल झाले. प.पू. कानिफनाथ महाराज यांमी स्वागत व प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन सौ. श्रद्धा राजन बोडेकर यांनी केले.