(रत्नागिरी)
कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयवंत सखाराम पवार (३६, रा. पोमेंडी बुद्रुक, रत्नागिरी), असे तरुणाचे नाव आहे. हा अपघात २५ एप्रिल रोजी सकाळी कुवारबाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर झाला होता.
सुदीप प्रकाश पवार (३५, रा. शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी) यांचा चुलत भाऊ जयवंत हा दुचाकी (एमएच ०८ एक्स ९७८४) ही घेऊन आदिनाथनगर येथे जात होता. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोरील रेल्वे पुलाजवळ तो आला असता त्याच्या दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला. त्यामुळे दुचाकीवरील जयवंत याचा ताबा सुटला व अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिस स्थानकात १९ मे रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
शहरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. हे कुत्रे गाड्यांचा पाठलाग करतात. तर कधी अचानक गाडीसमोर आडवे येऊन अपघात होतात. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सतत नागरिकांमधून होत असते. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. आता मोकाट कुत्र्यामुळे ३६ वर्षीय तरुण जयंवत पवार याला आपला जीव गमवावा लागला आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.