(संगमेश्वर)
सातत्याने कोकण रेल्वे आणि केंद्रीय रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्कात राहून देखील संगमेश्वर तालुक्यातील जनतेवर रेल्वे कडून अन्याय होत असल्याचे चित्र आहे. २४ जुलै २०२४ रोजी संगमेश्वर रोड स्थानकाबाबतच्या मागण्या आणि त्या संदर्भात कार्यवाही यासाठी आमदार शेखर निकम आणि निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुप चे सदस्य यांची बैठक कोकण रेल्वेच्या बेलापूर मुख्यालयात पार पडली.
तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा हा सकारात्मक प्रस्ताव दिनांक ३० जुलै रोजी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. परंतु गेल्या पाच महिन्यांत या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून पत्राद्वारे कळविण्यात आले. या पत्रात सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी थांबा दिलेल्या नागपूर मडगाव आणि नेत्रावती एक्स्प्रेसचा उल्लेख केला आहे.
रोहा, सिंधुदुर्ग , सावंतवाडीच्या रेल्वे स्थानकावर थांबे याच वर्षी मिळाले. मग संगमेश्वर तालुक्यातील जनतेवर अन्याय का? या आंदोलनात सर्वसामान्य माणूस स्वतःचा वेळ, पैसा खर्ची घालतो आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे पाठबळ या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या फेसबुक ग्रुपला नाही. मग संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या मतांवर सत्तारूढ होणाऱ्यांचे काही एक कर्तव्य नाही का? असा सूर आता जनतेमधून उमटत असल्याचे एकायला मिळत आहे.
या संगमेश्वर तालुक्यात किती राजकीय पक्ष आहेत आजी माजी आमदार, मंत्री, पुढारी आहेत. जर या प्रश्नाकडे साधी नजर फिरवली असती तर जे दृश्य रोहा सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी येथील लोकप्रतिनिधीनीमुळे रेल्वे थांबा मागणी संदर्भात दिसते आहे, कदाचित संगमेश्वर रेल्वे स्थानकावरसुद्धा दिसले असते. कोणी किती लढे द्यायचे त्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे! आपल्या मागण्या कशा रास्त आहेत ते पटवून द्यायला हवे. या सर्व प्रकारात कोकण रेल्वे आपली जबाबदारी चोख पार पाडत नसल्याने हा गोंधळ माजला आहे, असे संदेश जिमन यांनी म्हटले आहे.
या सहा वर्षात रेल्वे संबंधित आंदोलन असेल मागण्यांचा पाठपुरावा याबाबत पत्रकार संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम पार पाडले आहे. आता कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांना जोपर्यंत आरसा दाखवत नाही तोपर्यंत थांबायचे नाही. तर मागणी अमान्य झाल्यास २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी संगमेश्वर रेल्वे स्थानकावर उपोषण सुरू केले जाईल, अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली आहे.