(रत्नागिरी / प्रतिनिधी)
काँक्ट्रिकरणाचे रस्ते नागरीकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. खडीवरून दुचाकी घसरुन रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला धडकली यात त्या ७७ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील माळनाका येथे रविवारी सकाळी घडली. दत्तप्रसाद वासुदेव गोडसे (७७, रा. सन्मित्र नगर, रत्नागिरी) असे त्यांचे नाव असून, ते निवृत्त शिक्षक होते.
याप्रकरणी मुलगा यशोधन दत्तप्रसाद गोडसे (५०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार संतोष वासुदेव सोनार (४०, रा. सनगरेवाडी-कोतवडे, रत्नागिरी) याच्यावर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तप्रसाद गोडसे हे सकाळी ८:१० च्या दरम्यान माळनाका येथील हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जात होते. त्याचवेळी संतोष सोनार हे दुचाकी क्रमांक (एमएच ०८, एयू २६१५) घेऊन एसटी स्टॅण्ड ते मारुती मंदिर असे भरधाव वेगाने येत होते. माळनाका येथे ते आला असता, रस्ता ओलांडणाऱ्या दत्तप्रसाद गोडसे यांना दुचाकीची धडक बसली. यामध्ये दत्तप्रसाद गोडसे रस्त्यावर पडले. अपघातग्रस्त दुचाकीस्वाराने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर तपास करत आहेत.
रस्त्यावरील खडीमुळे नाहक बळी
सध्या शहरातील रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. काँक्रीटीकरणाच्या कामांतर्गत रस्त्याच्या बाजूला खडी टाकून ठेवण्यात आली आहे. या खडीवरून दुचाकी घसरून ती दत्तप्रसाद गोडसे यांना धडकली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नाहक ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला.
ठेकेदाराला जाग येणार का
काही दिवसांपूर्वीच शहरातील मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर करण्यात आलेल्या साईड पट्ट्यांवर मोठी खडी केवळ पसरवून ठेवल्याने या साईड पट्ट्या अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. साईड पट्ट्यांवर रोलर न फिरवल्याने वाहनचालक खरेदीसाठी जाताना आपली वाहने साईडपट्टीवर उभी करण्याऐवजी अर्ध्या रस्त्यातच उभी करत आहेत. तर पादचाऱ्यांना त्यावरून चालणे देखील अवघड बनले आहे. साईडपट्टी पादचाऱ्यांसह वाहनधारकांसाठी देखील आता डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदाराची सुरू असलेली मनमानी पद्धत नागरिकांच्या जीवावर उठत असताना त्यावर एकही पुढारी बोलत नसल्याचे अच्छर्य व्यक्त केले जात आहे. काँक्रीटीकरण रस्त्याच्या बाजूला दगड टाकले की खडी टाकली? पसरवून ठेवलेल्या खडीमुळे पादचाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. १०० कोटींच्या रस्त्यांनी असे बळी घेयचे ठरविलेय का? ठेकेदाराला आता तरी जाग येईल का? असे एक ना अनेक संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.