(नाणीज)
श्रीक्षेत्र जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे श्रीराम नवमी वारी उत्सवाला मंगळवारी सुरुवात झाली. सकाळी श्री सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग सुरू झाला. त्यानंतर मिरवणुकांनी जाऊन देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देण्यात आली. ब्राम्हवृंदानी मंत्रोच्चार सुरू केला. त्याने सारे वातावरण भरून गेले. नंतर श्री सप्तचिरंजीवी महामृत्युंजय याग व अन्नदान विधी सुरू झाला. त्यानंतर सुंदरगड येथील श्री संतशिरोमनी गजानन महाराज मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर, वरदचिंतांमणी मंदिर, नाथांचे माहेर येथील देवदेवताना आजच्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. ढोल-ताशे, कलषधारी स्त्रिया, ध्वजधारी पुरुष यांच्यासह या मिरवणुका निघाल्या. प्रत्येक मिरवणुकीची जबाबदारी वेगवेगळ्या जिल्हा समित्यांवर सोपवण्यात आली होती. त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढल्या.
दरवर्षी येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात होत असतो. यंदाही तो विविध कार्यक्रमांनी होत आहे. उद्या बुधवार उत्सवाचा मुख्य दिवस आहे. आज सकाळी नैमित्तिक धार्मिक विधी व चरण दर्शन सोहळा होईल. त्याचवेळी धर्मक्षेत्र प्रसारकांचा सत्कार होईल. ११.३० ते १ यावेळेत सुंदरगडावरील प्रभू श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा होईल. पाळणा व आरती केली जाईल. त्याबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी ३ ते ५ यावेळेत चरण दर्शन व धर्मक्षेत्र उद्दिष्टपूर्ती जिल्हे व पीठांचा सत्कार होईल.पालखी परिक्रमा होईल. रात्री प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर सर्वांचे आकर्षण असलेले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. देवाला साकडे घालून सोहळ्याची सांगता होईल.
या सोहळ्यासाठी भाविक येथे दाखल झाले आहेत. कडक उन्हामुळे येथे पिण्याच्या पाण्याची चांगली सोय करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी दोन दिवस २४ तास महाप्रसादाची सोय आहे. त्याचा लाभ भाविक घेत आहेत. काल सकाळी येथील येथील सदगुरु काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटलमध्ये सर्वरोगावर मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन झाले. नामवंत डॉक्टर्स येथे रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करीत आहेत.
सोहळ्यासाठी सुंदरगडावरील श्रीराम मंदिरासह सर्व मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ती फुला- पानांनी आकर्षक सजवण्यात आले आहेत. आता सर्वांना आजच्या मुख्य सोहळ्याचे वेध लागले आहेत.