त्या ग्रामसेवकावर सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश; तत्कालीन सरपंचावर कारवाई होणार?
( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
कोरोना महामारीच्या काळात बांगलादेशमधील एका नागरिकाला बनावट जन्म दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांच्या केलेल्या चौकशीत आढळून आल्याने संपूर्ण प्रकार उघड झाला आहे. एटीएसची स्थानिक पथकासह स्थानिक पोलिसदेखील या प्रकरणाचा तपास करत असून शिरगाव ग्रामपंचायतीला चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. मात्र प्रकरणाची कसून चौकशी सुरू असतानाच तत्कालीन ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार दिले आहेत.
कोरोनाच्या कालावधीत आपत्कालीन व्यवस्थापना व्यतिरिक्त प्रशासकीय काम थांबलेले असतानाही कोणतीही चौकशी न करता बांगलादेशी व्यक्तीला कोणत्या पद्धतीने दाखला देण्यात आला, याची चौकशी जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आली आहे. हा दाखला दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाबाबतची कोणती कागदपत्रे तयार केली आहेत का, यासह आधार कार्ड व अन्य कागदपत्रे तयार केलीत का, याचीही चौकशी केली जाणार आहे. बांगलादेशी व्यक्तीकडे असणारा मोबाईल कशा पद्धतीने त्याने मिळवला याचीही चौकशी पोलीस यंत्रणेकडून करण्यात येणार आहे.
दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस पाठवून यासंदर्भात संबंधितांचे जबाब नोंदवले. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात यामुळे अडकले आहेत. एटीएसचे स्थानिक पथक आणि शहर पोलिसांच्या एका वेगळ्या पथकाने सर्व कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर देखील जिल्हा प्रशासनाकडून संबंधित ग्रामसेवकाला मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संबंधित ग्रामसेवकाशी चर्चा केल्यानंतर त्याने चुकून झाल्याचे वरिष्ठांना सांगितल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली. परंतु तत्कालीन ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली जात असेल तर तत्कालीन सरपंचावर कोणती कारवाई होणार? हा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.