(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गणेशवाडी एस .टी. स्टॉप येथून नजीकच असलेल्या कंपनीतून नव्याने सिमेंट ब्लॉक बनविण्यात येत आहेत. या कंपनीला कंपाउंड वॉल नाही, त्यामुळे या कंपनीतील उघड्या परिसरात टाकलेली सिमेंटची पावडर (राख )मोठ्या प्रमाणात नदी नाले ओढे यातून वाहून जात असून येथील विहिरी व धरण्याच्या पिण्याच्या पाण्याला मोठा धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाहत्या पाण्यातून कंपनीतून मुक्तपणे बाहेर पडणारे सिमेंट युक्त दूषित पाणी संजिवांना अपायकारक ठरू शकते अशी स्थिती नागरिकांच्या दृष्टीस आली आहे. यामुळे आतड्याचे रोग पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. येथील नागरिकांनी या कंपनीच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कळझोंडी गणेश वाडी येथे ही कंपनी अनेक वर्षे कार्यरत आहे. या कंपनीतून राखेचे जाणारे पाणी कुंभवणेवाडी येथील विहिरीत व नदीमार्फत धरणाच्या पाण्यात जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कुंभवणेवाडी येथील विहिरीत व नदीत या सिमेंटच्या राखेचे थर साचले आहेत. त्यामुळे या पाण्याचा रंग बदलला आहे. सध्या या भागात पावसाचे प्रमाण थोडं कमी आहे. अचानक पावसाने तीव्र रूप धारण केले तर या कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेली सिमेंटची राख व कच्चे व खराब झालेले सिमेंटचे ब्लॉक कातळावर पावसाच्या दिवसातही उघड्यावर टाकून ठेवलेले आहेत. त्यामुळे जोराच्या पावसाने ही राख नदी नाल्यामार्फत धरणाच्या पिण्याच्या पाण्यात जाण्याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे.
कळझोंडी धरणातून जयगड प्रादेशिक नळ पाणी योजनेद्वारे परिसरातील १४ ग्रामपंचायत व २७ गावांना पाणीपुरवठा केला जातो शासनाचे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे धोरण आहे, परंतु कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे या धरणातील पाणी अशुद्ध होण्याची दाट शक्यता आहे. तरी कंपनीने या कंपनीला त्वरित कायमस्वरूपी कंपाउंड वॉल बांधून घ्यावे व परिसरात साचलेले पावडर/ राखेचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी येथील कळझोंडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीपशेठ पवार, पांडुरंग सनगरे ,महादेव आग्रे, किशोर पवार, वासुदेव घाणेकर यांनी केली आहे.
सदर कंपनीच्या परिसराची पाहणी करताना यावेळी उद्योजक श्री चित्तरंजन मुळये, संदीप पवार, वासुदेव घाणेकर, पांडुरंग सनगरे, किशोर पवार उपस्थित होते. सदर घटनेची जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांनाही निवेदन देऊन याबाबत माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. ग्रामपंचायतीने पर्यावरणाच्या कोणत्या निकषावर या कंपनीला परवानगी दिली? याबाबत चर्चा सुरू आहे.