(चिपळूण)
एका मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रसंग अधोरेखित करून संपूर्ण चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटातील कथानकाला शोभेल अशीच घटना चिपळूण तालुक्यातील दसपटी कादवड येथे घडली आहे. या गावात असणाऱ्या लोखंडी साकवाची चोरी झाल्याची तक्रार येथील सिद्धेश शिंदे यांनी चिपळूण येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
दसपटी भागातील आकले-कादवड या दोन गावांना जोडण्यासाठी लोखंडी साकव वजा पूल बांधण्यात आला होता. महापुरात हा साकव वाहून नदी पात्रात अडकला होता. मात्र, हा पूल ज्याठिकाणी होता, त्या ठिकाणी नसल्याचे कादवड येथील ग्रामस्थ सिद्धेश शिंदे यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी याबाबत आकले ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विचारणा केली मात्र त्यावर कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यानंतरही गेल्या चार महिन्यांत साकवाबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. आकले ग्रामपंचायतीकडे संपर्क साधला असता, आमच्याकडून तो हलविण्याबाबत काहीच सांगितले नसल्याचे सांगण्यात आले. मग इतका अवजड पूल कोणी व कोणाच्या सांगण्यावरून नेला, असा प्रश्न शिंदे उपस्थित केला आहे.
यांनी अखेर शिंदे यांनी याबाबत चिपळूण येथील कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी गावातील साकवाची चोरी झाल्याचे म्हटले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.