(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरून जाणाऱ्या दांडे येथील सागरी पूल गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या या पूलाचा एक पिलर तीन-चार वर्षातच खचला होता. याचा परिणाम संपूर्ण पुलावर एका बाजूला भार येत होता. त्या भाराने संपूर्ण पूल पडू नये यासाठी प्रशासनाकडून अवजड वाहनांसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर ही जवळपास तीन-चार वर्षे या पुलावरून एसटीची वाहतूक वगळता सर्व वाहतूक अनधिकृतपणे सुरू होती.
पिलर च्या दुरुस्तीसाठी सुरुवातीला सुमारे पाच कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र तो निधी वेळेवर न मिळाल्याने त्यामध्ये वाढ होऊन जवळपास आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. शासनाकडून हा निधी उपलब्ध झाल्यानंतर आणि सर्व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर मार्च 2023 रोजी या पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली.
दोन ते तीन महिन्यांमध्ये या पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र या पुलाचे काम जवळपास दीड वर्ष सुरू होते. दरम्यानच्या काळात परिसरातील लोकांकडून आणि वाहन चालकांकडून लवकरात लवकर पूल दुरुस्त होऊन वाहतूक सुरू व्हावी अशी मागणी वारंवार होत होती. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढार्याने यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र आता जवळपास दीड वर्षानंतर या पुलाचे काम पूर्ण होत असताना अनेक राजकीय पक्षांच्या पुढार्यांची श्रेयवादासाठी चढाओढ आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आपण आणि आपल्या नेत्यानेच कसा हा पूल मार्गी लावला हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियातून धडपड सुरू आहे.
हा पूल धोकादायक असल्याने आणि वाहतूक बंद ठेवल्याने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी या परिसरातील लोकांनी तत्कालीन आमदार म्हणून आपल्याकडे केली होती. त्याप्रमाणे आपण बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती आणि निधीची मागणी केली होती. दादा यांनी तात्काळ या पुलासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर प्रशासकीय मंजुरी मध्ये जास्त वेळ गेल्याने या कामाचे इस्टिमेट वाढून ते आठ कोटीपर्यंत गेले. त्यानंतर आपण तत्कालीन बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे वाढीव निधीची मागणी केली. त्यांनी ती मंजूर केल्यानंतर या कामाला सुरुवात झाल्याचे तत्कालीन विधान परिषद सदस्य आणि माजी आमदार हुस्नबानो खलीफे यांनी म्हटले आहे.
या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर ते काम जवळपास दीड वर्षे रखडले होते. दांडे पुलाला भेट देत पुलाचे पाहणी केली. त्यावेळी आता काम सुरू झाल्यानंतर सर्वच पक्षाचे पुढारी काम पूर्ण केल्याच्या श्रेयवादासाठी धडपडत असल्याबद्दल विचारले असता, आपण या श्रेय वादात पडणार नाही. आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार तत्कालीन बांधकाम मंत्र्यांकडे निधीसाठी मागणी केली होती आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि नामदार अशोकराव चव्हाण यांचे ऋणी असल्याचे स्पष्ट केले आहे.
जनतेसाठी हा मार्ग पुन्हा एकदा खुला होत आहे, याचे आपल्याला समाधान असून प्रत्यक्षात या कामाला विलंब झाला आहे हे मान्य करावेच लागेल. या श्रेयवादात अजिबात पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.