(पुणे)
अमेरिकेत बेपत्ता झालेला आपला मुलगा सुखरूप सापडेल या आशेवर असणाऱ्या आई-वडिलांना मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली. महिनाभरापूर्वी अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्याच्या इंजिनिअरचा मृतदेह शोधण्यास अमेरिकन रेंजर्सना यश आले आहे. अमेरिकेच्या मोंटाना राज्यातील ग्लेशियर नॅशनल पार्कमधील खाडीत 6 जुलै रोजी हा तरुण वाहून गेला होता. सिद्धांत पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. गेला महिनाभर अमेरिकन रेंजर्सकडून सिद्धांतचा शोध सुरु होता. सिद्धांतचा मृतदेह पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवारपर्यंत मृतदेह पुण्यात येण्याची शक्यता आहे.
सिद्धांत मूळचा पुण्याचा होता पण 2020 पासून तो अमेरिकेत राहत होता. तो कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिसमधून एमएस चे शिक्षण घेत होता. सिद्धांत त्याच्या काही मित्रांसह रॉकी माऊंटनमधील उद्यानात फिरायला गेला होता. त्याने उद्यानात फिरताना आईला फोन केला. आपण आपल्या इतर सहा भारतीय मित्रांसह फिरण्यासाठी बाहेर आलेलो आहोत, असे त्यांनी सांगितले. त्याने आईला मेसेज देखील केला होता की तो तीन दिवसांत सॅन जोसला परतणार आहे. मात्र यावेळी तो हिमस्खलन खाडीत पडला होता. सिद्धांतचा शोध घेण्यात अमेरिकन प्रशासन दिरंगाई करत आहे, असा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला होता. सिद्धांच्या वडिलांनी अमेरिकेतील तपास यंत्रणांनी त्वरित सिद्धांचा शोध घ्यावा अशी विनंती शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केली होती. मात्र अखेर त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
ग्लेशियर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या शोध कार्यानंतर, नॅशनल पार्कमधील रेंजर्सने सिद्धांत विठ्ठल पाटीलचा मृतदेह बाहेर काढला आहे. घटनेच्या वेळी त्याने घातलेले केलेले कपडे देखील जप्त करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास, एका व्यक्तीने घाटाच्या खाली एक मृतदेह दिसल्याची माहिती दिली. त्यानुसार रेंजर्सनी तातडीने तेथे जाऊन शोध घेतला असता सिद्धांत चा मृतदेह आढळून आला. या घटनेने पुण्यातील सिद्धांतच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Post Views: 3,414