(खेड)
तालुक्यातील कोंडिवली-निळीक मार्गावर ५० हजार रुपये किमतीच्या काडतुसाच्या बंदुकीसह गजाआड केलेल्या शाहरुख सलाम डावरे (२१, रा. कोंडिवली-खेड) याच्यावर बुधवारी रात्री उशिरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून बंदुकीसह दुचाकी व ७५ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा २ लाखांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
शाहरुख डावरे हा दुचाकी (एमएच ०४, डीएफ १०४०) वरून निळीक- कोंडिवली मार्गावर १२ बोअर सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला.
या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलिस शिपाई प्रकाश पवार, राहुल कोरे, सोहेल ढगे, चालक चिले यांचा समावेश होता. शाहरुख डावरे हा दुचाकीवरून निळ्या-पांढऱ्या कपड्यामध्ये काहीतरी गुंडाळून घेऊन कोंडिवली येथून निळीक येथे जात असताना पथकाने त्याला थांबवले. त्याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काडतुसाची बंदूक व एक जिवंत काडतूस आढळले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर बुधवारी रात्री उशिराने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाइलही जप्त केला आहे.
कोणाला विक्रीसाठी आणली होती?
ही बंदूक त्याने नेमकी आणली कुठून आणि कोणाला विकायला घेऊन जात होता, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक नितीन भोयर हे याप्रकरणी तपास करत आहेत. यापूर्वी पोयनार-कोंडीवाडी येथून ठासणीची बंदूक सापडली होती.