(संगमेश्वर / एजाज पटेल)
शिंदे सरकारच्या काळात लाडकी बहिण योजना सुरू झाल्यानंतर महिलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक उमेदवारांच्या पारड्यात याच लाडक्या बहिणींनी अगदी सहजपणे मते टाकली. याच मतांच्या जोरावर महायुतीच्या उमेदवारांना तारले असल्याचे चित्र निकालाअंती समोर आले. मात्र, निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या अर्जाची निकषानुसार पुन्हा छाननी होत असल्याने अनेक लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत. आता या विवंचनेत त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पैसे कधी जमा होणार अशी चर्चा लाडक्या बहिणी मधून सुरू झाली आहे, मला मिळणार की नाही, माझे नाव शासनाने बाद तर केले नसेल ना, अशी भीती सुद्धा त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
महायुती सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातून लाभ मिळण्यासाठी मोठया प्रमाणात लाडक्या बहिणींनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. त्यांना निवडणुकीपूर्वी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत प्रति महिन्याला 1500 रुपया प्रमाणे 7500 रुपये बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर पुन्हा डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांचे 1500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून लाडकी बहीण योजना बंद न करता प्रति महिना देण्यात येणाऱ्या 1500 रुपयात वाढ करून थेट 2100 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. याचा विधानसभा निवडणुकीत चांगला परिणाम दिसून आला.
आता निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनाशी पाईक राहून 2100 रुपयांचा फेब्रुवारी महिन्यांचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार की गाजर दाखवणार, अशी चर्चा लाडक्या बहिणी उपस्थित करत आहेत. तसेच आपला अर्ज काही अटी व निकषामध्ये अडकतो की काय? अशीही धाकधूक त्यांच्या मनाला सतावत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला काही अटी व निकष जाहीर केले होते. त्यानुसार ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज स्वीकारले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या योजनेतील सर्वच अर्ज सरसकट मंजूर करण्यात आले होते. चारचाकी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही. हे निवडणुकीच्या भाऊगर्दीत सरकार तपासायला विसरले की, पैसे देऊन मत पदरात घ्यायची होती हे कोड न सुटणार आहे. मात्र, आता अर्जाची छानणी होणार असल्याने महिलांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी बहिणींना हूरहूर लागली आहे.