(खेड)
उद्योजक सदानंद ऊर्फ आप्पा कदम यांनी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉलसमोरील त्यांच्या खासगी जागेत त्यांच्या फोटोसह एक वैयक्तिक बॅनर शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता लावला. मात्र, प्रशासनाने नंतर तो हटवला.
‘सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये’ अशा आशयाचा बॅनर होर्डिंगवर लावला. या बॅनरवर ना कोणते राजकीय भाष्य होते, ना स्वतः सदानंद कदम कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित आहे ते होते. ते उद्योजक आहेत. मात्र, उद्योजक सदानंद ऊर्फ आप्पा कदम यांनी ‘सूड’मायेच्या ओलाव्या’चे शब्द असलेला बॅनर लावल्याने अवघ्या काही मिनिटांत प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
नगर प्रशासनाचे अधिकारी हा बॅनर हटवण्यासाठी स्वतः सदानंद कदम यांना विनंती करू लागले. बॅनर का हटवावा, कोणत्या नियमांमध्ये हटवावा, हे लेखी सांगा, मग मी तो हटवतो, असे स्पष्ट म्हणणे त्यांनी अधिकाऱ्यांपुढे मांडले.
अखेर न. प. च्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा पोलिसांची मदत घेऊन अनिकेत शॉपिंग मॉलसमोरील हा बॅनर काढला. मात्र लावलेला एक बॅनर आणि झालेली धावपळ पाहता या बॅनरमधील वाक्य कोणत्या बड्या नेत्याच्या जिव्हारी लागले. सत्तेचा आणि पदाचा पुरेपूर वापर करून नियम डावलून बॅनर काढण्यासाठी एवढा आटापिटा कोणी का आणि कशासाठी केला, असा प्रश्न खेडवासीयांना पडला आहे. उद्योजक सदानंद ऊर्फ आप्पा कदम यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा मात्र गल्लोगल्ली सुरू झाली आहे.