(रत्नागिरी)
दिनांक २६/०४/२०१८ रोजी मेंगलोर येथून मुंबई येथे जाणा-या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा पोलीसांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणणा-या आरोपी सर्जील पिलपिले रा. मिरजोळे, रत्नागिरी यास चिपळूण येथील मे. अति.व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी भा.द.वि कलम ३५३,३३२,५०४,५०६ अन्वये ३ वर्षे सक्तमजूरी आणि रूपये १२,०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २६/०४/२०१८ रोजी आरोपी सर्जील पिलपिले व त्याचा भाऊ आसिफ पिलपिले असे मेंगलोरकडून मुंबईकडे जाणा-या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये रत्नागिरी स्टेशनला त्यांचेकडे जनरल डब्याचे तिकीट असताना राखीव स्लीपर कोचमध्ये बसले. त्यावेळेला तिकीट तपासनीसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितले. त्यास त्यांनी नकार दिला म्हणून सर्जील पिलपिले यांना चिपळूण रेल्वे स्टेशनला गाडी गेल्यावर जनरल डब्यात जाण्यास सांगितले. परंतु सदर आरोपी जनरल डब्यात न जाता स्लीपर कोचमधील प्रवाशांशी जागेवरून वाद घालत होते. म्हणून रेल्वे सुरक्षा बलातील पोलीसांना बोलावले असता सदर सर्जील पिलपिले व त्याचा भाऊ हे दोन्ही पोलीसांच्या अंगावर धावून गेले व त्यांना मारहाण केली. एका रेल्वे कर्मचा-याच्या हातातील टॉर्च खेचून ती त्याच्या कपाळावर मारली. शिवाय त्यांना शिवीगाळी करून रत्नागिरीत आलात तर बघून घेतो अशी धमकी दिली. म्हणून रेल्वे कर्मचारी श्री. शेळके यांनी प्रथम पनवेल रेल्वे पोलीसांकडे तकार दिली व त्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरूध्द तक्रार दिली. त्यानंतर आरोपीविरूध्द चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाअंती पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. एम. शेळके यांनी न्यायालयात आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्याने गुन्हयातील एक आरोपी आसिफ पिलपिले फरार असून विदेशात पळून गेल्याने आरोपी सर्जिल पिलपिले याचे विरूध्द सदरचा फौजदारी खटला चालविण्यात आला.
सदर केसची सुनावणी अति. सत्र न्यायालय, चिपळूण येथे सुरू होती. त्याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री. शेट्ये यांनी एकूण ०८ साक्षीदार तपासले व पुराव्याअंती अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी सर्जिल पिलपिले यास भा.द.वि कलम ३५३,३३२,५०४,५०६ अन्वये दोषी ठरवून त्यांस ३ वर्षे सक्तमजूरी व रूपये १२,०००/- दंडाची शिक्षा सुनावली. सदर कामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले तर पोलीस पैरवी म्हणून स.पो.फौ श्री. विनायक एम. चव्हाण यांनी काम पाहिले.