(चिपळूण)
चिपळूण तालुक्याची उर्दू शिक्षण परिषद महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणच्या भव्य हाॅलमध्ये तालुका समन्वयक अशफाक पाते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात वांगडे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याच्या कुराण पठणाने झाली. हम्द पठण, नआत पठण सुरेल आवाजात वांगडे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित विद्यार्थ्यांचे उत्तम सादरीकरण वांगडे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सबिहा चौगुले यांनी केले.
विद्यार्थ्यांना होणारे नेत्रविकार या समस्येवर तसेच नेत्रदानाचे महत्त्व आणि त्यापासून अंध व्यक्तींना होणाऱ्या लाभाबाबत डॉक्टर जानवलकर यांनी अनेक उदाहरणासह माहिती दिली. विद्यार्थ्यांची विशेष करुन विद्यार्थीनींची सुरक्षा कशी ठेवावी? शाळेत आणि शाळेच्या बाहेरही विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी मुलींना आत्मरक्षेसाठी प्रेरणा द्यावी. मुलींना काही गैर वाटल्यास पोलीस ठाण्यात किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्यास प्रेरित करावे. अशा प्रकारे सुरक्षेबाबत अत्यंत आवश्यक माहिती पोलीस ठाणे चिपळूणच्या हेड कांस्टेबल रमा करमरकर यांनी दिली. शाळा व्यवस्थापन समिती पूर्नगठित करणे. शाळा व्यवस्थापन समिती ची कार्ये त्यांचे अधिकार या बाबत ज्ञान प्रकाशन फाऊंडेशन चे विजय माने यांनी उत्तम माहिती दिली
सखी सावित्री समिती गठीत करून विद्यार्थ्यीनींच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याचा योग्य प्रकारे निपटारा करणे. या बाबत सावर्डे अडरेकर उर्दू शाळेच्या शिक्षिका फातिमा कुपे यांनी योग्य मार्गदर्शन केले. इंग्रजी विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याचे उदाहरणासह कान्हे उर्दू शाळेचे शिक्षक शैलेश कुळे यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. शाळेत तक्रार का असावी? तक्रार पेटी कोणाकोणाच्या उपस्थित तक्रार पेटी उघडण्यात यावी? तक्रार पेटीत तक्रार असल्यास काय कार्यवाही करावी या बाबत सविस्तर माहिती सावर्डे अडरेकर उर्दू शाळेच्या शिक्षिका अजमिना पांगारकर यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गट समन्वयक अशफाक पाते आणि सहाय्यक शौकत कारविणकर यांनी मेहनत घेतली. या शिक्षण परिषदेसाठी तालुक्यातील सर्व उर्दू शाळांचे सर्व शिक्षक वेळेत उपस्थित राहिल्याबाबत अब्दुल कादिर तांबे यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले.