(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील विमानतळावर त्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वचनपूर्ती सोहळ्याचे बॅनर झळकत आहेत. मुख्यमंत्री जाणाऱ्या कोकणनगर, किर्तीनगर येथील रस्त्यावर रस्ता उखडून खडीचे साम्राज्य पसरलेले आहे. खड्डेमय रस्त्यांबाबत वचनपूर्ती सोहळा कधी? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे.
उद्या मुख्यमंत्री रत्नागिरीत येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विमानतळ येथील टर्मिनल इमारत भूमिपूजन सोहळा, कोकणातील पहिल्या इंजिनियर इमारतीचा उद्घाटन व नामकरण सोहळा, ४५ हजार महिलांचा “माझी लाडकी बहीण” योजनेचा कार्यक्रम असे एकूण तीन कार्यक्रम उद्या दिनांक २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील खडबडीत रस्त्याला तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरणाचे पॅच मारण्यात आले आहेत. कोकणमार्गावर काही ठिकाणी जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मंत्री महोदयांचे विमानतळ येथे आगमन होणार असल्यामुळे कोकणनगर मार्गाच्या रस्त्यावर लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्तीचे मोठं-मोठे बॅनर झळकले असून मंत्र्यांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू असंल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र कोकणनगरमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. डांबरीकरणाचा रस्ता उखडून वर आलेली बारीक खडी दुचाकी चालकांना अपघाताला निमंत्रण देत आहे. रात्रीच्या सुमारास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता याच रस्त्यामधून मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना प्रवास करावा लागणार की त्यापूर्वी प्रशासन खड्ड्यांवर उपाययोजना करणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.