(मुंबई)
मुंबई पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर घाणेरडे आरोप लावून त्यांची बदनामी करणारे व्हायरल पत्र तयार करणाऱ्याचा शोध लागला आहे. हे परिवहन विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच लिहून ते वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्री यांना पाठवले होते, असे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मोटार परिवहन विभागातील अंतर्गत वादातून हा पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिला कॉन्स्टेबलच्या सह्यांचे हे पत्र जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पत्रात मोटारपरिवहन विभागाच्या दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर कथित घाणेरडे आरोप लावून त्यांची बदनामी करण्यात आली होती. या पत्रामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त यांनी या व्हायरल पत्राची दखल घेऊन गुन्हे शाखेला या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने १० पेक्षा अधिक व्यक्तींचे तसेच पत्रात नमूद केलेले हवालदार आणि विभागात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. “युनिटमध्ये अशा कोणत्याही वर्तनाबद्दल कोणीही आरोप केले नाहीत,” अशी माहिती मिळाली. हे पत्र कोणी पोस्ट केले याविषयी, एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाचा एक भाग म्हणून, पोलिसांना आढळले की तैनात असलेला एका पोलीस हवालदार जो गेल्या काही आठवड्यांपासून फरार होता. तोच हे पत्र पाठवण्यास जबाबदार आहे, असे तपासात निष्पन्न झाले.
मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिला कॉन्स्टेबल यांनी पोलिस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पुरुष कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त आणि मुंबईतील सहपोलीस आयुक्त यांना पोस्टाने पाठवण्यात आल्याची प्रत समाज माध्यमावर तसेच पोलीस दलात जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
व्हायरल कथित पत्राची आम्ही सखोल माहिती घेतली असता त्यातील कथीत अर्जदारांकडे चौकशी करण्यात आली, सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व बोगस सहीचा वापर करून कोणीतरी खोडसाळपणा करून जाणीवपूर्वक हे कृत्य करण्यात आले आहे. व्हायरल पत्रातील माहिती ही पूर्णपणे चुकीची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मोटार परिवहन (एम.टी) विभागातील आठ महिला हवालदारांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या त्या बनावट पत्राची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांनी पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीच्याच विभागातील एका हवालदाराविरोधात संशय व्यक्त केला आहे. पुरावा म्हणून, पोलिसांनी सांगितले की त्यांच्याकडे आणखी दोन पोलिसांचे जबाब आहेत, ज्यात हवालदाराने पळून जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पत्र पाठवल्याबद्दल गोपनीय माहिती दिली आहे.