(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडी येथील नदीवर मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय तसेच तरवळ माचिवलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तरवळ नदीच्या रूंद पात्र असलेल्या नदीवर श्रमदानातून जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व तरवळ गावातील ग्रामस्थ महिला यांनी लक्षवेधी असा बहुउपयोगी बंधारा बांधण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला.
रत्नागिरी तालुक्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी बंधारा उभारण्याचा संकल्प जाकादेवी विद्यालयाला सदिच्छा भेटी प्रसंगी मांडला होता.या बंधारा बांधण्याच्या संकल्पनेचे शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करुन मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रेरणा दिली. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य असा बंधारा उभारण्याचे काम यशस्वी केले. सुमारे १०० पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा संकल्प पूर्णत्वास नेला. यात स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.विद्यार्थांची धडपड आणि उत्साह पाहून शिक्षक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांना अधिकच प्रेरित केले.
दोन दिवसीय निवासी शिबीरातून हा बंधारा विद्यार्थ्यांनी श्रमदानातून उभारला. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधलेला बंधारा पाहण्यासाठी रत्नागिरी तालुक्याचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी तरवळ गावात येऊन बंधारा पाहण्यासाठी प्रत्यक्ष चढ-उताराचा मार्ग सुमारे २०मिनिटे पायी चालत जाऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्याला भेट दिली .विद्यार्थी व साहाय्य केलेल्या ग्रामस्थांचे त्यांनी मनापासून खास कौतुक केले.
अतिशय नियोजनबद्ध बंधारा पूर्णत्वास नेला हे पाहून मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे उपक्रमशील चेअरमन सुनिल मयेकर यांनी समाधान व्यक्त केले.सहभागी शिबीरार्थी व ग्रामस्थ यांना धन्यवाद दिले.या बंधाऱ्याचा उपयोग अनेक वस्त्यांना होणार आहे. पशु-पक्षी, झाडे तसेच परिसरातील नागरिकांना हा बंधारा अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. रत्नागिरी तालुक्याचे तहसिलदार यांनी खास करून शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. एक प्रशासकीय अधिकाऱ्यांने जंगलमय छोट्या पायवाटेने जाऊन विद्यार्थ्यांनी बांधलेला बंधारा बघण्यासाठी एवढी उत्सुकता दाखवली, त्या उत्सुकतेबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर, तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिबीर प्रमुख,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी तहसीलदार साहेब यांना मनोमन धन्यवाद दिले.
तहसिलदार यांनी भाषणातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, या गावातील ग्रामस्थांचा एकोपा आणि काम करण्याची एकजूट वाखाणण्याजोगी आहे. शैक्षणिक व इतर सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण दाखले गावातील लोकांना एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी तरवळ गावात एक लवकरच विशेष शिबीर घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शिवाय गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, मुबलक पाण्याने आपला परिसर समृद्ध व्हावा,यासाठी धरणासारखा एक मोठा प्रकल्प हाती घेण्याचा आणखी एक संकल्पना तहसीलदार यांनी मांडली आहे. या संकल्पनेचे गावातील लोकांनी स्वागत केले आहे.
या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, सरपंच रमेश मालप, उपसरपंच सुयोग माचिवले, माचिवले वाडीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते महादेव माचिवले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णा सनगरे, ज्येष्ठ नागरिक अनंत माचिवले, प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अर्जुन माचिवले, देवेंद्र माचिवले, शशिकांत माचिवले, सांस्कृतिक विभाग व शिबीर प्रमुख संतोष पवार, क्रीडा शिक्षक व शिक्षक प्रतिनिधी संतोष सनगरे, किशोर नलवडे, अवधूत जाधव, शिक्षक प्रतिनिधी अरुण कांबळे, मालगुंड गावचे युवा कार्यकर्ते, देणगीदार निखिल सुर्वे, महसूल विभागातील अधिकारी व पदाधिकारी, देणगीदार ग्रामस्थ यांसह शिबिरातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी, छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.चेअरमन बंधू मयेकर यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या कामगिरीची कौतुक करून बहुमोल मार्गदर्शन केले. शिबीर सहभागी झालेल्या सुमारे १०० विद्यार्थ्यांची भोजनाची व निवासाची अतिशय उत्तम सोय माचिवलेवाडीतील ग्रामस्थांनी करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रबोधनाचा संदेश दिला. निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याच्या वर्गाचे महत्त्व शिक्षकांनी पटवून दिले.कबड्डी स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिबीर प्रमुख संतोष पवार अरुण कांबळे यांनी केले, तर आभार शिक्षक प्रतिनिधी क्रीडा शिक्षक संतोष सनगरे यांनी मानले.उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व स्टाफने व माचिवले ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.शिबीर समारोप करताना विद्यार्थीनी प्रतिनिधी सिध्दी खानविलकर व विद्यार्थी आदित्य शिंदे यांनी आपले शिबीराचे अनुभव सांगताना निसर्गाच्या सान्निध्यात राहून समायोजन व स्वावलंबन कौशल्य अवगत झाले. सामुहिक वृत्ती वाढीस लागली, सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली,त्याबद्दल शिक्षण संस्थेला व ग्रामस्थ यांना धन्यवाद दिले.