(रत्नागिरी)
सार्वजनिक ठिकाणी जेथे कचरा टाकला जातो अशा सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत; तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावती पुस्तक घेऊन गस्त घालायला लावा. कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी व पोलिस विभागाच्या साहाय्याने कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्या.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतगत मार्च २०२५ अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करून गावे हागणदारीमुक्त अधिक उत्कृष्ट करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू झाली आहे. त्यासंदर्भातील बैठकीत कीर्ती किरण पुजार यांनी सरपंचांना निर्देश दिले. शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रामध्ये निवासी संकुलाचे प्रमाण जास्त आहे. घनकचरा व्यवस्थापन सुविधा नसल्याने या निवासी संकुलांमधील कचरा इतरत्र टाकला जात आहे. तसेच ग्रामपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये निवासी संकुलांची संख्या अधिक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत असल्याचे दिसून आले आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन निवासी संकुलांमध्येच केल्यास सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा भार कमी होईल. त्याकरिता कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायत शिरगाव, मिरजोळे, पोमेंडी बु, कर्ला, कुवारबाव, नाचणे, खेडशी यांचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली.
या बैठकीमध्ये या ७ ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचे ढिगारे सार्वजनिक ठिकाणी असल्याचे निदर्शनात आल्याचे पुजार यांनी सांगून त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याबाबत स्पष्ट केले. त्याकरिता रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे व नाचणे येथील निवासी संकुलांना भेट देऊन तेथील रहिवासी तयार करीत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन (कंपोस्टिंग) अतिशय उत्तम व चांगल्या प्रतीचे असल्याबाबत अधोरेखित केले. त्या धर्तीवर शहरालगतच्या सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या परिक्षेत्रात असलेल्या सर्व निवासी संकुलांना कचऱ्याचे व्यवस्थापन स्वः खर्चाने त्यांच्या स्तरावर करण्याकरिता प्रेरित करावे, असे आवाहन केले.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, पी. एन. सुर्वे, पन्हाते, शिरधनकर तसेच ७ ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, रत्नागिरी नगरपरिषदेचे उपअभियंता अविनाश भोईर, तसेच जिल्हा कक्षातील सल्लागार, तज्ज्ञ उपस्थित होते.