(खेड)
डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून आणलेले खोकल्याचे औषध घेऊन झोपलेल्या खेडमधील २३ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. शुभम प्रवीण कदम (रा. महाडनाका, शिवसमर्थ नगर एसटी डेपोसमोर, खेड) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला.
शुभम याला ४ ते ५ दिवसांपासून खोकला लागला होता. परंतु, तो डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून खोकल्याचे औषध घेऊन आला. हे औषध घेऊन तो मंगळवारी रात्री झोपला होता. त्यानंतर मध्यरात्री त्याच्या काकांच्या मुलीने शुभम उठत नसून काहीच हालचाल करत नसल्याचे सांगितले.
त्यानंतर शुभमच्या काकांनी शुभमच्या घरी जाऊन खात्री केली असता त्याला आवाज दिला. तसेच त्याला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.