(रत्नागिरी)
कठोर परीश्रम, अभ्यास आणि नशिब या दोन चाव्या यशाचे दार उघडतात. रिल्स बघण्यात किंवा मोबाईल गेम खेळण्यात आयुष्य वाया घालवू नका. एक तास जरी वाया गेला तरी आपल्याला हळहळ वाटली पाहिजे. तुम्ही जे शिकाल तेच तुमच्यासोबत असेल, मित्र, गुरु कायम नसतात. त्यामुळे वृत्तपत्र, पुस्तके वाचा, पाहा, ऐका, तयारी करा, असे प्रतिपादन रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला रत्नागिरीचे सुपुत्र, 2022 च्या एमपीएससी राज्य सेवा परीक्षेतून यश मिळवलेले बीडीओ, डेप्युटी सीईओ ऋषिकेश सावंत, अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, अकादमीच्या समन्वयक अॅड. सोनाली खेडेकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
श्री. चांदणे म्हणाले की, विद्यार्थी घडण्यासाठी नेहमी प्रयत्नशील अकादमीचे प्रयत्न चांगल्या रितीने सुरू आहेत. याकरिता खूप खूप शुभेच्छा देतो. स्पर्धा परीक्षा देताना शॉर्टकटचा उपयोग करू नका. जेव्हा आपण एखादं चांगलं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वेळ लागतो, पण यश मिळतं. ही परीक्षा पाठांतर करून दिली जात नाही. तर त्यासाठी तुमचे गणित पक्के हवे, अचूक अंदाज बांधता यायला हवा. दोन वर्षे प्रचंड मेहनत घ्या मग पुढची पन्नास वर्षे चांगली सेवा करू शकाल. अभ्यास करताना कुठल्या राज्यात नद्या, पर्वत, पीक, व्यापार, संस्कृती याचा सखोल अभ्यास करा. मागची प्रश्नपत्रिका अभ्यासा, ठोकताळे बांधा. प्रश्न वेगाने कसे सोडवायचे, त्यावर अचूक गोल कसा करायचा, याचा अभ्यास करा.
ऋषिकेश सावंत यांनी सांगितले की, पदवी परीक्षेवेळी मी स्पर्धा परीक्षा द्यायचे ठरवले. नोकरी करून परीक्षा देत होतो. २०१७ मध्ये नोकरी सोडली. २०२० मध्ये कोरोना आला. चार वर्षांत माझ्या हाती काहीच नव्हतं. पण मला क्लासवन अधिकारीच व्हायचे असल्याने मी परीक्षा द्यायला सुरवात केली. १२ परीक्षा दिल्या, फक्त राज्य सेवामध्ये उत्तीर्ण झालो. २०२२ च्या मेन्स परीक्षेत यश मिळाले. तुम्ही किती नवीन नवीन गोष्टी शिकता, घरच्यांचा पाठिंबा, आपली कौटुंबिक, सामाजिक स्थिती लक्षात घेऊन परीक्षा दिल्या पाहिजेत. एकाच परीक्षेवर लक्ष्य केंद्रिय करा. विश्लेषण करता आले पाहिजे, गणित म्हणजे फक्त आकडेमोड नव्हे, लॉजिकली विचार करायला शिकवते. निर्णयक्षमता विकसित होत जाते. आधीच्या प्रश्नपत्रिका सोडवा. शांत डोक्याने विचार करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यापुढेही अकादमीमध्ये मार्गदर्शन करायला येत राहीन.
यांचा झाला सत्कार
अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतून यशस्वी झालेले आयटीआय वरिष्ठ लिपीक आशिष दांडेकर, तलाठी श्रद्धा दैत, तसेच अरुअप्पा जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या चालू घडामोडी परीक्षेतील प्रथम अमेय नागवेकर, द्वितीय नेहाल गमरे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सूत्रसंचालन नूतन परांजपे यांनी केले.