(जाकादेवी / वार्ताहर)
लहान वयात स्वत:वर केलेले संस्कार चिरकाल टिकणारे असतात. त्यामुळे शालेय वयात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा ह्या अत्यंत महत्वाच्या असतात. यामधून जय – पराजयापेक्षा विद्यार्थ्यांनी खिळाडूवृत्ती जोपासावी असे उद्गगार राज्यस्तरीय पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव यांनी काढले. ते रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर योग्य विचार बिंबवले जाण्याची गरज असून त्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असतात. प्रत्येक शाळा आणि शिक्षक विविध प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना मैदानात होत असतो. अशावेळी या लहान वयात मोठी स्वप्ने बघण्यासाठी खिलाडूवृत्ती आत्मसात केली पाहिजे, यासाठी शाळा, पालक आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
स्पर्धेच्या सुरुवातीला प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अमित वाडकर आणि सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान जिल्हा परिषद रत्नागिरीच्या समाजकल्याण समितीच्या माजी सभापती ऋतुजा जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख दिपक सुतार, सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे, शेखर भडसावळे, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढवळे, सुहास मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी बुंदे साहेब यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत कबड्डी, खो खो, लंगडी, बॅडमिंटन, गोळा फेक, थाळी फेक, बुद्धिबळ हे सामने खेळविण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने पटकावले. यावेळी सांघिक प्रकारातील सर्व विजेते, उपविजेते आणि वैयक्तिक प्रकारातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्याना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे नियोजन केंद्रप्रमुख दिपक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद केंद्रातील शिक्षकांनी केली. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाटद शितपवाडीचे अध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक संदीप शितप आणि वाटद बौद्धवाडीचे अध्यक्ष भाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद बौद्धवाडी आणि वाटद शितपवाडी मधील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.