(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज चे निवडक विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षक झाले आणि दिवसभराचा सर्व कार्यभार व्यवस्थित पार पडला.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1940 रोजी झाली. यंदाचे हे 84वे वर्ष आणि त्यानिमित्ताने मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदर सुरू झालेली ही संस्था सुरुवातीला बळीराम परकर विद्यालय या नावाचे एक रोप लावले गेले, आज त्याचा वटवृक्ष झाल्याचे दिसते. सध्या शिक्षण संस्थेच्या तीन माध्यमिक शाळा आणि दोन कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यामध्ये 2ते 3 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.
बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावा आणि प्रत्येक सर्वसामान्य विद्यार्थी शिकला पाहिजे या हेतूने त्याकाळच्या संचालक मंडळाने विचार करून ही संस्था स्थापन केली, आणि आजही तीच परंपरा आजही प्रत्येक संचालक मंडळ करताना दिसते आहे.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला. एक दिवसासाठी विद्यार्थी शिक्षक बनले आणि एक दिवसाचा पूर्ण शाळेचा कारभार पार पडला. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिपाई बनून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन, मार्गदर्शन केले आणि शिक्षकांप्रमाणे दिवसभर विद्यार्थ्यांना विविध विषय शिकविले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनाही वेगळा अनुभव घ्यायला मिळाला, तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसला. सर्व शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
वर्धापन दिनानिमित्त मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर यांनी प्रशालेत येऊन सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.