( मकरंद / सुर्वे संगमेश्वर )
जिल्हास्तरीय कला उत्सवात संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय शिवने बुरंबीच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यात प्रज्वल घडशी व आकांक्षा सप्रे यांची कलाकृती लक्षवेधी ठरली. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड झाली आहे.
केंद्र शासनामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कला- गुणाना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘कला उत्सवाचे’ आयोजन केले जाते. यावर्षी पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे रविवार दि. २९ रोजी जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हयातून अनेक माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. यामध्ये दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थी, दृश्यकला (चित्रकला) कथाकथन व नृत्य या तीन कला प्रकारात सहभागी झाले होते. दृश्य कला प्रकारात प्रज्वल महेश घडशी १२ वी याने प्रथम क्रमांक तर कथाकथन मध्ये नववीतील आकांक्षा योगेश सप्रे तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबरोबरच नृत्य प्रकार दहावीतील नियती घडशी व दिव्या मोरे यांनी देखील क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी याच कला उत्सवात नियती महेश घडशी हिची राज्यस्तरावर नाट्य-भूमिका या कला प्रकारासाठी निवड झाली होती. प्रज्वल घडशी व आकांक्षा सप्रे हे दोन्ही विद्यार्थी राज्यस्तरीय कला उत्सव पुणे येथे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विद्यार्थी वर्गातील कलागुण हेरून त्यांना विकसित करण्याचे कौशल्य अवगत असलेले कलाशिक्षक प्रदीप शिवगण यांच्या माध्यमातून असे अनेक कला क्षेत्राशी निगडित विद्यार्थी विभाग आणि राज्यस्तरावर बाजी मारून घवघवीत यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
फोटो: रत्नागिरी येथील कला उत्सवात प्रथम क्रमांकात बाजी मारणारे दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक कलाशिक्षक प्रदीप शिवगण, शिक्षिका मिनाक्षी यादव