(रत्नागिरी)
देवदर्शनासह सुट्टीतील मौज-मजा करण्यासाठी आरे-वारे समुद्रकिनारी आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाले. त्यातील तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाईकांना यश आले असून, पंकज रामा गाडेकर (वय 33 राहणार पुणे, मूळ कारवांचीवाडी रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी 6:30 वाजता ही घटना घडली.
नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गाडेकर कुटुंब रविवारी दुपारी अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे येथे विघ्नहर्ता दर्शनासाठी गेले होते. विघ्नहर्ताचे दर्शन घेतल्यानंतर गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्याने त्या समुद्रात न जाता गाडेकर कुटुंबीय आरे- वारे समुद्र किनारी दाखल झाले. सुमारे 5:30 वाजता गाडेकर कुटुंबीयातील पंकज रामा गाडेकर, मयुरी पंकज गाडेकर, बालाजी रामा गाडेकर व त्यांचा एक भाचा असे चौघेजण होण्यासाठी समुद्रात उतरले होते.
कमी पाण्यात मौजमजा सुरू असतानाच अचानक आलेला लाटेने पंकज गाडेकर लाटे बरोबर आत ओढले गेले. लाटे बरोबर ते आत जात असल्याचे लक्ष येताच त्यांची पत्नी मयुरी व भाऊ बालाजी हे त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले. यावेळी तेही पाण्यात बुडू लागले यावेळी किनाऱ्यावर असलेल्या त्यांच्यासमवेत आलेल्या मुले,महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पाण्याबाहेर काढले. परंतु पंकज गाडेकर हे खोल पाण्यात बुडाले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
स्थानिकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकला संपर्क केला, परंतु 108 रुग्णवहीका तासाभराने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर चौघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पंकज रामा गाडेकर यांना मृत घोषित करण्यात आले.