(संगमेश्वर)
छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि मार्लेश्वर; कर्णेश्वर; सप्तेश्वर या सारख्या जागृत देवस्थानांची भूमी असणा-या; पर्यटनदृष्ट्या अतिशय सक्षम आणि निसर्गसंपंन्न संगमेश्वर तालुक्यात दळणवळणाचे लांब पल्ल्याचे साधन म्हणून प्रवासी वर्गाची रेल्वेला एस टी इतकीच पसंती मिळते. मात्र आवश्यक सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुक्याचा पर्यटन विकास रखडल्याचे चित्र आहे. रेल्वेची उदासिनता; महामार्गाचे कुर्मगतीने सुरु असणारे काम; पर्यटन किंवा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे तालुक्याच्या विकासात नेहमी अडथळे येतात.
“कोंकण रेल्वेच्या माध्यमातुन पर्यटकांची सख्या तालुक्यात वाढू शकते आणि त्यातुनच तालुक्याचा पर्यटन विकास साध्य होइल. मनी ऑर्डरवर जगणा-या स्थानिक जनतेला स्वत:च्या उत्पन्नाचे साधन तयार करता येइल” असे मत रेल्वेच्या समस्यांवर काम करणा-या संदेश जिमन यानी व्यक्त केले. संदेश जिमन यानी याबद्दल विस्तृत प्रतिक्रिया दिली. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती एक्सप्रेस ला थांबा मिळाला परंतु त्यासाठी जवळपास चार वर्ष संघर्ष करावा लागला. नेत्रावतीला थांबा मिळाल्याचा परिणाम म्हणुन संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. पाच कोटीचा टप्पा या वर्षी आमच्या स्थानकाने ओलांडला. त्यानंतर आरक्षण खिडकी ची मागणी पुर्ण झाली. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. पुढे जाऊन आम्ही आणखी नऊ गाड्याना थांबा मिळावा म्हणुन निवेदन दिले आहे. परंतु त्याच दरम्यान निवडणूक आचारसहिंता सुरु झाली. येणा-या काळात या पैकी काही गाड्याना थांबे मंजुर होतील अशी अपेक्षा आहे”
“४ जुनला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नवीन सरकार स्थापन होइल. या सरकारमधील जे कुणी रेल्वे मंत्री असतील ते आमच्या मागण्याना न्याय देतील अशी आशा व्यक्त करुया. परंतु येत्या 30 जुनपर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाकडून आमच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही येत्या १५ ऑगस्ट पासून लोकशाहीच्या मार्गाने उपोषण करण्याचा पवित्रा घेऊ” असा इशाराही पत्रकार संदेश जिमन यांनी दिला.
“पर्यटनातुन तालुक्याचा विकास साधायचा असल्यास स्थानिक नेत्यानीही आमच्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा करावा. हा विकास साधण्यासाठी रेल्वे सारखा उत्तम पर्याय उपलब्ध असताना राजकीय इच्छा कुठेतरी कमी पडतेय असे चित्र सध्या या तालुक्यात दिसत आहे अशी खंतही जिमन यांनी बोलुन दाखवली.