(मंडणगड)
मंडणगड तालुक्यातील धामणी-बोरखत येथे सापडलेल्या एका कातळ शिल्पानंतर या गावापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या काटे कातळकोड या गावातील मोकळ्या सड्यावर कातळशिल्पे आढळून आली आहेत. या शिल्पांमध्ये मानवी आकृती, पक्षी व प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या कातळशिल्पांचे संशोधन व संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. पूर्वकालीन ऐतिहासिक वारसा जतन होणे आवश्यक असून, तालुक्याच्या पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे.
प्रागैतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. अश्मयुगीन काळातील आदिमानवाने दगडात कोरून ठेवलेल्या विविध शिल्पे किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गुढ खोदचित्रे आहेत. या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे इसवी सन पूर्व काळ असावा, असे मत अभ्यासक नोंदवतात. महाराष्ट्रात कोकण भागात अशी कातळशिल्पे आढळून आली आहेत.
यामध्ये एक मानवी आकृती वेगवेगळ्या आकाराचे मासे, गाय, बैल, बकरी, मुंगूस, शंकराची पिंड आणि इतर वेगवेगळी न समजता येईल अशी लहान मोठी अशी कोरलेली वीस कातळ शिल्पे बघायला मिळतात. या कातळ शिल्पे असलेल्या भागापासून जवळच जंगलात उंच टेपावर एक पाणबुरुज सुद्धा आहे त्याला बाबुल टेंबा असेही म्हणतात. गुडेवर गावचे निसर्गप्रेमी अभ्यासक प्रितेश कदम यांनी सांगितले की परिसरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मित्रांच्या मदतीने भटकंती करून ही कातळशिल्प शोध मोहीम राबवली असे सांगितले. यामध्ये विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आढळून आली असून त्यांची साफसफाई करून सभोवताली दगड लावून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या कातळशिल्पांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. या भागात आणखी कातळशिल्पे आढळून येण्याची शक्यता आहे. संबंधित जमीन मालकांनी या कातळ शिल्पांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन करावे. यामुळे त्यांच्या जागेला देखील महत्त्व प्राप्त होणार आहे असे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी सांगितले.