(जैतापूर / वार्ताहर)
अणसुरे येथे रस्त्यावर लोंबकळत असलेल्या तारांना डांबराच्या ड्रमवर काठी लावून दिलेला आधार आणि केलेले जुगाड चर्चेचा विषय ठरला आहे. राजापूर तालुक्यातील अणसुरे गावातून जाणाऱ्या चव्हाणवाडी तिठा ते पंगेरेवाडी पर्यंतच्या सुमारे पाच ते सहा किलोमीटर रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू आहे. हे काम करत असताना अनेक ठिकाणी रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गावात असलेले अनेक जुने पोल आणि त्यावरील तारा आणि रस्ता यांच्यामधील अंतर कमी झाले आहे. धोकादायक ठरू शकणारे पोल बदलण्याची आवश्यकता आहे. अनसुरे आणि पंगेरे गावातून जाणाऱ्या का नाही त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यालगत अनेक विद्युत पोल असून ते रस्त्याच्या कामामुळे बदलावे लागणार आहेत किंवा त्यांची उंची वाढवावी लागणार आहे.
मात्र हे काम कोणी करायचे याबाबत संभ्रमावस्था असून हे काम ठेकेदाराचे आणि संबंधित विभागाचे असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येत असून तसा पत्रव्यवहारही झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भागाची पाहणी केली असून वीज वितरण कंपनीने हे काम केले पाहिजे असे सांगण्यात आल्याचे काही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
याबाबत अनसुरे सरपंच रामचंद्र कनेरी यांनी दोन्ही, विभागांना आपल्याकडून पत्रव्यवहार झाला असल्याचे सांगण्यात आले असून रस्त्याचे काम होत असतानाच धोकादायक स्थितीतील या तारा आणि पोल वेळच्यावेळी बदलून मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अणसुरे गावठाण येथील रस्त्यावर डांबराच्या पिंपावर काठी लावून रस्त्यावर लोंबकळत असलेल्या तारांना वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी तात्पुरता आधार दिला असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या ठिकाणचा पोल आणि तारा तात्काळ सुस्थितीत न केल्यास आणि एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.