(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ, साखरी बौद्धवाडी आणि सामग्गी बौद्धजन सेवा संस्था (रजि.) यांचेवतीने जयगड येथील वायुगळती घटनेसंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिनांक १२ डिसेंबर रोजी जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या परिसरात गॅस गळतीमुळे शेजारील माध्यमिक विद्यामंदिर जयगड व कला वाणिज्य जुनिअर कॉलेज जयगडच्या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी व श्वसनाचा होऊ लागल्याने जिल्हा शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले आहे.
जेएसडब्ल्यू चे जनसंपर्क अधिकारी यांना कुणबीवाडी नांदिवडे येथील संजय गुरव यांनी सकाळी १० वाजता गॅस लिकेज होत आहे, याबाबत कळविण्याकरता फोन केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहे. तरी सदर जनसंपर्क अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच मुलांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कंपनीकडून कोणती उपाययोजना केली आहे याचा लेखी स्वरूपात खुलासा आमच्या वाडीला द्यावा. तसेच प्रशासनाने कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली याची माहिती दयावी. तर कंपनी जोपर्यंत एच एन जी गॅस प्रकल्प त्वरित बंद करण्याबाबत लेखी स्वरूपात देत नाही, तोपर्यंत आम्ही मौजे जयगड गाव बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ८ साखरी बौद्धवाडी व सामग्गी बौद्धजन सेवा संघ संस्था (रजि) जिल्हा परिषद शाळा साखरी मराठी व माध्यमिक विद्यामंदिर जयगड व कला वाणिज्य जुनिअर कॉलेज जयगड येथील विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे.
तसेच दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून आम्ही जेडब्ल्यू एनर्जी व पोर्ट कंपनी बंद आंदोलन करणार आहोत. तरी याबाबत आपण व प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाची प्रत माहितीसाठी रत्नागिरीचे प्रांताधिकारी, जयगड पोलीस निरीक्षक, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यामंदिर जयगड व जुनिअर कॉलेज कला व वाणिज्य जयगड, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापिका जिल्हा परिषद मराठी शाळा साखरी जयगड मुख्याध्यापिका यांना दिली आहे. या निवेदनानंतर जयगड येथील शाखेच्या माजी सरपंच राजेंद्र जाधव, जयगड शाखेचे अध्यक्ष सुहास सावंत, चिटणीस मंदार सावंत, सर्व कार्यकारणी व महिला मंडळाने म्हटले आहे की, जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. तरच खऱ्या अर्थाने कंपनी व प्रशासनाला जाग येईल व सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपयोजना केल्या जातील.