( रत्नागिरी )
शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशीर असलेल्या खेड तालुक्यातील रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणदे गणवाल या शाळेचे शिक्षक नामदेव मोकिंदा राठोड यांना कोल्हापूर येथील अविष्कार फाउंडेशनने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार- २०२४ ने सन्मानित केले.
राठोड एम.ए. बी.एड. असून त्यांनी शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद भारत सरकारमार्फत माहिती व संप्रेशन तंत्रज्ञान कोर्स पूर्ण केला आहे. केंद्रस्तर, प्रभागस्तर, तालुकास्तर तंत्रस्नेही शिक्षक म्हणून १० वर्षांपासून काम व मार्गदर्शन करत आहेत. अतिदुर्गम भागातील शाळा सुंदर, भौतिक सुविधांनी सुसज्ज, डिजिटल व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी कंपनी, सामाजिक संस्था व मुंबई मंडळ यांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख रुपये शैक्षणिक उठावातून शाळा डिजिटल व सुंदर केली. स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, नवभारत साक्षरता अभियान अशा विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात सतत सहभाग ते घेत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व अन्य मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.