(रत्नागिरी / प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि). तसेच विश्व समता कलामंच लीवले संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सामाजिक, शैक्षणिक, कला-क्रीडा, पर्यावरण अशा विविध स्तरावर नाव लौकीक मिळवलेल्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. याच अनुषंगाने १९८० सालापासून सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे अशा प्रकाश गंगाराम सावंत यांची दखल घेऊन त्यांना सांस्कृतिक क्षेत्रात राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली गावचे प्रकाश सावंत हे १९८० पासून आजपर्यंत लोकसंगीत जलसा सामाजिक प्रबोधन कार्यक्रम विविध करतात. शिवाय १९९० पासून ३४ वर्षात ३० नाटके सामाजिक विनोदी कौटुंबिक प्रकारची दिग्दर्शन करून वेगवेगळ्या भूमिका ही सादर केल्या आहेत. यापैकी शिल्पकार नाट्य मंडळ चरवेलीत २४ नाटके व ६ नाटके बाहेर गावी केली आहेत. यंदा गावी २५ वे नाटक त्यांच्या दिग्दर्शनाने होणार आहे. त्यांनी “महाराष्ट्र समता प्रवर्तक संगीत जलसा मंडळ चरवेली” या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन , दारूबंदी, हुंडा बंदी, अनिष्ट रूढी-परंपरा बंदी, कौटुंबिक आशयाचे लिखाण स्वतः करून, स्वताच्या दिग्दर्शनाचे वग नाटीकांचे सादरीकरण केले आहे. प्रकाश सावंत यांचा आवाज ही पहाडी आहे. मात्र ते राजाश्रय मिळवण्याच्या स्पर्धेत कधीच उतरले नाही.
परंतु या सर्व कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच तसेच विश्व समता कलामच संस्थेने घेऊन त्यांना विश्व समता राज्य पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडे दहा वाजता शुभगंधा मंगल कार्यालय (मयूरबाग-लोवले, तालुका संगमेश्वर) येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रकाश सावंत यांना सांस्कृतीक क्षेत्रात पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.