(रत्नागिरी)
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक हे गेली १९ वर्षे अल्प मानधनावर कार्यरत आहेत. तरीही त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. तीन-तीन महिने वेतन थकीत आहे. या चालकांनी १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. या चालकांनी आंदोलन केल्यास त्याचा मोठा परिणाम रुग्णसेवेवर होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात १०२ या रुग्णवाहिकेवर वाहन चालक २००५ पासून अल्प मानधनावर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांवर रात्रं-दिवस चालक रुग्णांच्या सेवेत २४ तास कार्यरत आहेत. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही वाहन चालक काम करतात. यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. ही अत्यावश्यक सेवा बजावत असताना त्यांना अनेक वाहन चालकांची नोकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे. आता दुसरीकडे नोकरीची संधी नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.
कोणत्याहीवेळी सेवा देण्यास तत्पर असणाऱ्या आणि तशी देवा देणा ऱ्या या चालकांना अल्प मानधनावर काम करावे लागते आणि तेही वेळेवर मिळत नसल्याची खंत वाहन चालकांकडून व्यक्त करण्यात आली. अनेकदा अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना भेटून थकीत मानधन व मानधन वेळेवर मिळावे, मेळावे, अशी मागणी करत आहेत.
दरम्यान, तीन महिन्याचे थकीत मानधन मिळावे, या मागणीसाठी रुग्णवाहिका चालकांनी कामबंद करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मानधन देण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर केवळ एका महिन्याचे मानधन देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. दरम्यान, या चालकांनी आता १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे पत्रही जिल्हा परिषदेला दिले आहे.