(रत्नागिरी)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि त्यातील फरक, तसेच मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपयांची वाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कामगार संघटनांनी दि. ९ व दि. १० जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कर्मचाऱ्यांना ‘डनडोअर’ आणि आउटडोअर मेडिकल कॅशलेस’ योजना लागू करावी, एसटीचे खासगीकरण बंद करावे, वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात यासारख्या विविध मागण्यांसाठी एसटी संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनापूर्वी एसटी बँकेच्या कारभार विरोधात सहकार आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास दि. ९ ऑगस्टला क्रांती दिनापासन राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
या आंदोलनाबाबतचा ठराव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एसटी कामगार सेना, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक या संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.