(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प.प.श्री. वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात दिनांक 19 व 20 ऑक्टोबर रोजी 20 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे ) स्वामी महाराज प्रबोधिनीचे विश्वस्त सी. एस. नितीन देशपांडे यांनी दिली. यावेळी प्रबोधिनीच्या विश्वस्त डॉ. श्वेता जेजुरकर,दिगंबर जोशी गोगटे जोगळेकरचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आदी उपस्थित होते.
अधिवेशनामध्ये परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या साहित्यावर दिनांक १९ आणि 20 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षापूर्वी स्वामीजींच्या श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील समाधी स्थानी दिनांक 19 आणि 20 ऑक्टोबर २००२ रोजी नारायण काका ढेकणे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनीची स्थापना झाली. स्वामीजींच्या संपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन, विविध भाषांमध्ये भाषांतर, स्वामीजींच्या संपूर्ण जीवनकार्याचा प्रसार ही प्रबोधिनीची मुख्य उद्दिष्टे आहेत.
परमहंस श्रीमत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म 1854 साली सावंतवाडी जवळील माणगाव गावी गणेश टेंबे आणि रमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव वासुदेव ठेवले. श्री द्विसहस्त्री गुरुचरित्र, श्री दत्तपुराण, श्री कृष्णालहरींवरील टीका, युवा शिक्षा आणि वृद्ध शिक्षा यांसारखी फार मोठी ग्रंथसंपदा संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवली आहे. त्यामुळे या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन परम पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनीचे विश्वस्त नितीन देशपांडे, श्वेता जेजुरकर तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी केले आहे.