(चिपळूण / प्रतिनिधी)
वंचीत बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूण मध्ये मोर्चा चे आयोजन केले होते. बुधवारी या मोर्चा ला प्रशासनाकडून परवानगी नाकारली असतानाही मोठा प्रतिसाद मोर्चाला मिळाला. अण्णा जाधव यांना पाठिंबा असल्याचे आंबेडकरी जनतेतून दाखविण्यात आले.
निवडणुकीचा काळ सुरू असताना चिपळूण कळबट येथील बौध्दवाडी येथे आमदार भास्कर जाधव यांनी बौद्ध समाजाला जातीवाचक वक्तव्य करत अपमानित केल्याचा, हिनवल्याचा असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) अण्णा जाधव यांनी केला होता. प्रकरणाला महिना उलटला तरीही आमदार भास्कर जाधव यांच्यावर कोणतीही कारवाईची भूमिका प्रशासन घेत नसल्याने याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिनांक १२ डिसेंबर रोजी विराट मोर्चा काढणार असा इशारा अण्णा जाधव यांनी दिला होता. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने मोर्चा काढवा लागत असल्याचे अण्णा यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाला मोर्चासाठी जमाव बंदीचे आदेश शिथील करून परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. असे असतानाही प्रशासनाने परवानगी दिली नाही तरीही आयोजित मोर्चा नियोजनाप्रमाणे काढणार आहोत अशी रोखठोक भूमिका अण्णा जाधव यांनी घेतली होती. आता आयोजित मोर्चासाठी प्रशासनाने वीस अटी घालून परवानगी दिली असल्याने मोर्चाला भव्य स्वरूप येण्याची शक्यता आहे. हा मोर्चा आमदार भास्कर जाधव यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ काढण्यात येत असल्याचे अण्णा यांनी सांगितले. गुढे फाटा-बहादूर शेख नाका चिपळूण- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चिपळूण असा या मोर्चा ला मोठा प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून आले
वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तरी अजूनही संबंधित पोलिसांनी कोणताही गुन्हा आमदार भास्कर जाधव यांच्यावर दाखल केला नसल्यामुळे आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट सर्वजित बनसोडे यांनी चिपळूण पोलिसांना आठ दिवसांचा गुन्हा दाखल करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
यावेळी बनसोडे म्हणाले की, नवनिर्वाचित आमदार भास्कर जाधव यांना सत्ता आणि संपत्तीचा प्रचंड माज आहे. तो उतरवण्यासाठी आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली. मोडतोड करणाऱ्याला भीमसैनिकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. जर यापुढे संविधान व लोकशाहीला गालबोट लावाल तर त्याचा माज उतरवण्याशिवाय आम्ही आंबेडकरवादी जनता शांत बसणार नाही. त्यासाठी आंबेडकरी जनता प्रसंगी रस्त्यावर उतरेल. परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृती तोडफोडीचा निषेध म्हणून लाखो करोडो लोक महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारला,ब्राह्मणवाद्यांना इशारा देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. तुम्ही तुमचा मनमानी कारभार करण्याची हिंमत कराल तर लाखो संविधानवादी जिवंत आहेत. आमच्या अंगामध्ये पाणी वाहत असून सळसळते रक्त आहे. त्यामुळे आम्ही संविधान वाचवण्यासाठी मैदानात उतरलो असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर…
महाराष्ट्रातील पोलिसांना ॲट्रॉसिटी चा कायदा कळत नाही. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई टाकण्यात आली, आणि त्यांचा माज उतरवण्यात आला. आम्ही कॅबिनेट मंत्र्यांना देखील गुडघ्यावर आणतो, त्यासाठी वंचितचे हजारो वकिलांची फौज अशा अशांचा माज उतरवण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी एक लक्षात ठेवावे की भास्कर जाधव यांचे राज देशात चालत नाही, तर संविधान चालते. भास्कर जाधव यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असाल तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना ॲट्रॉसिटी कायद्याचे पुस्तक भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण पोलिसांवर भास्कर जाधव यांनी दबाव टाकल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जर यापुढे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर संबंधित पोलिसांना देखील जेलमध्ये टाकू असा इशारा त्यांनी यावेळी चिपळूण पोलिसांना दिला. भास्कर जाधव यांना भाषण करण्याची सवय आहे, पण त्यांना माहीतच नाही की काय भाषण करावे. भाषण करता करता बोलून गेले, एका विशिष्ट जातीचा नामोल्लेख त्यांनी केला. भारताच्या संविधानानुसार अनुसूचित जातीमध्ये या जातीचा उल्लेख केला आहे पण जाहीर रित्या ही जातीचा उल्लेख करता येत नाही. पोलिसांना या घटनेचे गांभीर्य बहुदा माहित नसेल त्यामुळे पोलिसांना पण माझे सांगणे आहे की, संसद आमची नसेल पण बाहेरचे रस्ते आमचे आहेत. कोण भास्कर जाधव कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा हा मोठे आहेत का ? आ.जाधव यांना शरम वाटली पाहिजे, एकेकाळी त्यांना 35000 मताधिक्य मिळत होते. ते आता केवळ 2800 वर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आ.जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना चिपळूण येथे यायला मजबूर करू नका असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
….अन्यथा गुन्हा दाखल न केल्यास
तसेच पोलिसांना ही विनंती केली की तुम्ही देखील कायदा हातात घेऊ नका व भास्कर जाधव यांना पोलीस पाठीशी घालत असून असे न करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या लोकांना वाटते की माझी जात मोठी तुमची जात छोटी त्यांचा देखील माज उतरला असून आता आरक्षणासाठी सर्वचजण रांगेत असल्याचे दिसून येत आहे. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही वरिष्ठ आहोत. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा गुन्हा दाखल न केल्यास आठ दिवसात संबंधितांना धडा शिकवू असा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रशासनाला देण्यात आला.