(रत्नागिरी)
रत्नागिरी येथील घनकचरा प्रकल्पासाठी स्टरलाईटसाठी घेतलेल्या जागेपैकी पाच एकर जागा दिली जाणार असून, या ठिकाणी शहराजवळच्या ग्रामपंचायतींच्या कचऱ्याचीही विल्हेवाट लावली जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीच्या घनकचरा प्रकल्पासाठी शासनाने साडेआठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी स्टरलाईट प्रकल्पांतर्गत जागेमधील दरीसारख्या भागात असणारी पाच एकर जागा निश्चित केली जाणार आहे. एमआयडीसी यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. शहराच्या घनकचरा प्रकल्पासोबतच शहरलगतच्या नाचणे, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव या गावांच्या घनकचऱ्यावरही प्रक्रिया होणार आहे. आजूबाजूच्या गावे म्हणजे वाढत्या शहरीकरणाचा भाग आहेत. या ठिकाणी सरकारी कर्मचारीही मोठ्याप्रमाणात राहतात. त्यामुळे सर्वांनाच सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कुवारबाव येथील काही ग्रामस्थांनी घनकचरा प्रकल्पासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याबाबत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी चर्चा करावी, असेही ना. सामंत यांनी सांगितले.
दोन गुंठे जागा प्रकल्पग्रस्तांना…
बाल्को कंपनीसाठी १९७१मध्ये जागा घेण्यात आली होती. त्यानंतर ती स्टरलाईटच्या मालकाच्या ताब्यात गेली. कारखाना न झाल्याने, ही जागा अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे खास बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी दोन गुंठे जागा देण्याचा निर्णय घेतला जाईल आणि भविष्यात होणाऱ्या प्रकल्पात नोकऱ्या दिल्या जातील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.