( रत्नागिरी )
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण आर्ट्स कॉमर्स आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्कॉलर सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोहम भावे (शिर्के हायस्कूल, रत्नागिरी), वैष्णवी चव्हाण (राजापूर हायस्कूल, राजापूर), आणि पार्थ जाधव (फाटक हायस्कूल, रत्नागिरी) या तिघांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. ज्ञानदा काटकर (जागुष्टे हायस्कूल, रत्नागिरी), स्वामिनी लागवणकर (भू हायस्कूल, राजापूर), मारिया काझी (कसबा हायस्कूल, संगमेश्वर), सुरज चौधरी (नवनिर्माण हायस्कूल, रत्नागिरी) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
रत्नागिरी, लांजा, राजापूर, आणि संगमेश्वर या चार तालुक्यातून प्राथमिक फेरीसाठी १ हजार ६५३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. अंतिम फेरीसाठी १३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यातील ७२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातून प्रथम तीन क्रमांक आणि चार उत्तेजनार्थ असे एकूण सात विद्यार्थी निवडण्यात आले.
स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज (१४ डिसेंबर) संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट तसेच संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रा. सुकुमार शिंदे, स्पर्धेचे संयोजक प्रा. प्रकाश पालांडे उपस्थित होते. प्रथम तीन क्रमांकांना ३ हजार, २ हजार आणि एक हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र, तर चार उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी पाचशे रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देऊन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. बापट यांनी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना काय करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वेळेचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता आले पाहिजे. ध्येय ठरवून ते गाठण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी हे करताना त्यात सातत्य आणि समर्पण असावे आणि सगळ्यात महत्त्वाचे ताण व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट) करता आले पाहिजे, असा सल्ला देतानाच कठोर परिश्रमाशिवाय मार्ग मिळणार नाही असेही त्यांनी श्री . बापट यांनी नमूद केले. कोकणातील मुले आपला गाव शहर सोडायला मागत नसल्याची खंतही त्यांनी या वेळेला व्यक्त केली.
संचालिका सौ. हेगशेट्ये यांनी स्कॉलर सर्च परीक्षेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेतल्या हुशार, बुद्धिमान विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन, आयोजन, संयोजन करावे लागते आणि ही भूमिका “नवनिर्माण” बजावत आहे त्याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी या वेळेला सांगितले.
प्राचार्या सौ. जगदाळे यांनी कोकण बोर्ड राज्यात प्रथम आहे मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये कोकण विभाग नेहमीच मागे पडतो ही वस्तुस्थिती असल्याचे सांगतानाच स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा यांशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
सीईओ डॉ. गीते यांनी विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक उंचीला वाव देण्यासाठी स्कॉलर सर्च परीक्षा महत्त्वाची असल्याचे नमूद करताना विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानार्थी न होता आपल्या इतरही कलागुणांना वाव दिला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्पर्धेचे संयोजक प्रा. प्रकाश पालांडे यांनी स्पर्धा घेण्यामागची पार्श्वभूमी विशद केली. कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक उपस्थित होते.