(साखरपा / दीपक कांबळे)
दिवंगत मानकी अर्जुन कांबळे याआपल्या आजीच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त नातू वैभव चंद्रकांत कांबळे याने पहिल्या स्मृतीदिनापासून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू ठेवले आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी 2019 रोजी आजीचे वयाच्या 105 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे हा सोनेरी संगम साधून वैभव कांबळे यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू केले आहे. दरवर्षी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दहावी बारावी आणि पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन सन्मानित केले जात आहे.
15 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सेंद्रिय शेती मार्गदर्शक संदीप कांबळे, पाली माजी नायब तहसीलदार बी.के कांबळे, नाणिज सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एम के सुर्वे, किसन सुर्वे, माजी सरपंच रमेश ढवळ, साखरपा पोलीस दुरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विशेष सत्कारामध्ये पीएचडी उत्तीर्ण झालेले प्रीती नाना जाधव व स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये एम.इ उत्तीर्ण झालेली अंजली राजेश कांबळे या दोघींचा विशेष सत्कार मुजावर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी पालक हितचिंतक व आजूबाजूच्या गावातून सुमारे दीडशे लोकांची उपस्थिती लाभली होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर मॅडम याने म्हटले की, विद्यार्थ्यांनी उच्चतम शिक्षण प्राप्त करण्यासाठी महासागरात पोहायला शिकलं पाहिजे. मोबाईलचा वापर आवश्यक तेवढा जपून केला पाहिजे. गुन्ह्याचे कोणतेही कृत्य घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अर्थात पालकांनी सुद्धा या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे असे चांगल्या प्रकारे उदबोधक असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम माजी पोलीस पाटील मनोहर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश धोंडू कांबळे यांनी उत्तमपणे केले.
तर आपल्या भारदस्त आवाजात गीतांच्या ओळीतून समाज प्रबोधन प्राथमिक शिक्षक कुमार भजनावळे यांनी करून कार्यक्रमाचे शोभा वाढवली. शेवटी कार्यक्रमाचे आयोजक वैभव कांबळे व तुकाराम द्वारका कांबळे यांचे भरभरून कौतुक उपस्थितांकडून करण्यात आले.