(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी ग्रा. पं . सदस्या स्मिता संजय दुर्गवळी यांची आज सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. मालगुंड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) वर्चस्व आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली सत्ता या ग्रामपंचायतीवर अबाधित राखली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर निवडून जाणाऱ्या सदस्यांना ठाकरे गटाकडून उपसरपंचपदावर बसण्याचा बहुमान ठरवून दिला जातो. तसेच ठाकरे गटाकडून निवडून येणाऱ्या प्रत्येक समाजातील उमेदवाराला ग्रामपंचायतीच्या महत्त्वाच्या पदावर बहुमान देण्याचा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून घेतला जात आहे. त्यातूनच आता प्रत्येक समाजातील सदस्य उमेदवाराला महत्त्वाच्या पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळत आहे. त्यामुळे मालगुंडमधील सर्वच समाजातील ग्रामस्थांकडून विशेष समाधान व्यक्त केले जात आहे.
एकूणच मालगुंडमध्ये असलेल्या चार प्रभागांमधून ग्रामपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकूण तीन ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंच पदाचा मान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वप्रथम प्रभाग क्रमांक चार मधून उपसरपंच पदी संतोष दत्ताराम चौगुले यांना पहिल्यांदा उपसरपंच पदी बसवण्याचा बहुमान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिला. त्यानंतर त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्यांदा कुणबी समाजाचा उमेदवार म्हणून नवनिर्वाचित उपसरपंचपदी प्रभाग क्रमांक एक मधील महिला ग्रामपंचायत सदस्या स्मिता दुर्गवळी यांना बसविण्याचा निर्णय पक्षीय निर्णयानुसार तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया मालगुंड ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पाडली.
यावेळी सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणूक प्रक्रिये प्रसंगी विरोधी पक्षाच्या एकाही ग्रामपंचायत सदस्याकडून उपसरपंच पदासाठी अर्ज (नामनिर्देशन पत्र) सादर न झाल्याने स्मिता दुर्गवळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ही बिनविरोध निवडी प्रक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदाच्या खुर्चीत स्मिता दुर्गवळी यांना मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता घेऊन व त्यांच्या सहकारी सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य यांचे वतीने विराजमान करून त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले.
यावेळी त्यांचे समवेत तालुकाप्रमुख बंड्या साळवी, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, शिवसेना पदाधिकारी तथा माजी सरपंच प्रकाश जाधव, माजी उपसरपंच संतोष चौगुले ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच तथा तंटामुक्त गाव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक दुर्गवळी शेखर खेऊर , जगन सुर्वे, प्रवीण सुर्वे, रोहित साळवी, साईनाथ जाधव, दशरथ साळवी, मयूर पाटील, बाबा आग्रे, संजय दुर्गवळी आदींसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या उपसरपंच पदाच्या निवड कार्यक्रमात माजी सरपंच तथा तंटामुक्त गाव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक दुर्गवळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी, रत्नागिरी तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष राजू साळवी आदीने आदींनी आपल्या मनोगतातून स्मिता दुर्गवळी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती साधना साळवी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच स्मिता दुर्गवळी यांची मालगुंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मालगुंड तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिले आहेत. या निवडीबद्दल सौ स्मिता दुर्गवळी यांचे मालगुंड गावातील सर्व ग्रामस्थ आणि महिला भगिनींकडून तसेच मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी कलापथक व राजे ग्रुप व महिला मंडळ यांचेकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.