(चंद्रपूर)
विधानसभेच्या निवडणूका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. या सगळ्यामध्ये मनसेनी आघाडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात चंद्रपूर येथील बैठकीत आणखी दोन उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे, विधानसभेसाठी मनसेकडून आत्तापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, विधानसभेसाठी मनसेकडून राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या बाबतीच षटकार ठोकला आहे.
चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, यापूर्वी मराठावाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, विदर्भ दौऱ्यात 2 उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेनं विधानसभेचा षटकार ठोकल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांत आघाडी घेत मनसेचे 6 उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्याची सुरुवात सोलापूरमधून केली होती. सोलापूरमध्ये मुक्काम केल्यानंतर त्यांनी धाराशिव ते हिंगोली असा मराठवाडा दौरा केला. या दौऱ्यात सोलापूरमधूनच त्यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह दिलीप धोत्रे या दोन उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, मुंबईतील शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर, लातूर येथून आणखी एका उमेदवारांची घोषणा करण्यात आली. लातूर ग्रामीणसाठी संतोष नागरगोजे यांना मनसेचं तिकीट देण्यात आलं आहे. तर, हिंगोली दौऱ्यावर असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी बंडू कुटे यांना राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी, कुटे यांच्या खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्हीच यांच्याकडे लक्ष द्या, असे आवाहनही मनसैनिकांना केलं होतं.
राज ठाकरे यांनी घोषित केलेले मनसेचे 6 उमेदवार
1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
उमेदवारी जाहीर करताच मनसैनिकांत राडा
चंद्रपुरात राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या दोन गटात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी विदर्भात जाहीर केलेल्या 2 उमेदवारांपैकी राजूरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती आहे. चंद्रप्रकाश बोरकर हे मनसेचे चंद्रपूर जिल्हा सचिव असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा सचिन भोयर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता, आणि त्या मुद्द्यावरूनच दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वादावादी झाली आणि नंतर प्रकरण धक्काबुक्की आणि एकमेकांना मारण्यापर्यंत गेले होते.