(कणकवली)
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी खारेपाटण गावात दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरी गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारेपाटण मच्छी मार्केट परिसरात रविवार, २ फेब्रुवारी दुपारी ही गिधाडे मुक्तसंचार करत होते.
कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावामध्ये सुख नदीच्या काठावर मच्छी मार्केट परिसरात कुक्कुट पालनातील कचरा आणि मासळीचे उरलेले अवयव टाकलेल्या परिसरात या गिधाडांचे संचार दिसून आला. त्या वेळी घारी, बगळे, कावळे घिरट्या घालतात. उंचावरून या आलेला गिधाड्यांच्या मागे कावळे लागले. ती दोन गिधाडे इमारतीच्या छतावर बसली होती. छायाचित्रकार रमेश जामसांडेकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यातील एका गिधाडाचे छायाचित्र टिपले. त्यानंतर हे गिधाड सुख नदीच्या पलीकडील डोंगराच्या – दिशेने आकाशात झेप घेत निघून गेले. सोशल मीडियावर या गिधाडांचे फोटोग्राफ टाकून पक्षी वन्यजीव गिधाड की घार यांची विचारणा करण्यात आली. मुंबईतील पर्यावरण वन्यजीव म्हणून कार्यरत असलेले प्रतिनिधी अभ्यासक अक्षय मांडवकर यांनी फोटोग्राफ मागून घेत अखेर युरेशियन ग्रिफॉन गिधाड असल्याचे सांगितले.
कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. कोकणातील म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांत गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. प्रामुख्याने या ठिकाणी पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. शिवाय स्थलांतर करून येणाऱ्या हिमालयीन ग्रिफॉन, युरेशियन ग्रिफॉन, आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, खारेपाटणमध्ये दिसलेले गिधाड हे युरेशियन ग्रिफॉन प्रजातीचे निमवस्यक आहे. युरेशियन ग्रिफॉन गिधाडे प्रामुख्याने भारताच्या मध्य प्रदेशामध्ये क्वचितच दिसतात. खारेपाटण मध्ये आढळलेले गिधाड ही स्थलांतरादरम्यानच या ठिकाणी आली असावीत. पश्चिम घाट कोकण परिसरात रायगड आणि सिंधुदुर्गातील तिलारी प्रदेशात युरेशियन गिधाड स्थलांतर करून येत असल्याच्या तुरळक नोंदी आहेत.