(गुहागर)
महाविद्यालयात येणाऱ्या तीन प्राध्यापकांना गाडीतून खाली उतरवून त्यांना संस्थाचालकांनी संस्था अध्यक्षांसमक्ष मारहाण केल्याचा प्रकार गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात घडून आला. याप्रकरणी संस्थाचालकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बॉम्बे युर्निव्हरसिटी अँण्ड कॉलेज टीचर्स युनियन (बुक्टू) यांनी आ. भास्कर जाधव यांना दिले आहे.
प्रा. गोविंद सानप, प्रा. अनिल हिरगोंड व प्रा. संतोष जाधव हे दि. १८ डिसेंबर सकाळी ८. ३० वाजता महाविद्यालयात येत असताना गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संस्थासंचालक, एक महिला व त्यांचे इतर सहकारी यांनी त्यांना गाडीतून उतरायला सांगितले. ते खाली उतरताच त्यांना मारहाण सुरु केली. महाविद्यालयात चाललेल्या मालप्रैक्टिस बदल मुंबई विद्यापीठाने जी चौकशी समिती गठीत केली आहे ते तुम्हीच निनावी पत्राद्वारे विद्यापीठाला कळवले असल्याचा आम्हाला संशय आहे असे म्हणून मारहाण सुरू केली. या प्राध्यापकांनी आम्ही अशी तक्रार केलेली नाही असे सांगूनही हे संस्थाचालक ऐकले नाहीत.
दरम्यान, १५ मिनिटांनी महाविद्यालय पोर्चमध्ये सर्व प्राध्यापक आले असता तिथे प्रा. निलकंठ भालेराव हे मारहाण झालेल्या सहकाऱ्यासोबत असताना पुन्हा प्राचार्यासमोर भालेराव यांच्यासह प्रा. सानप, हिरगोंड व जाधव यांना हाताने व लाकडी काठीने मारहाण केली. या प्रकाराबद्दल महाविद्यालयात चालणाऱ्या बेकायदेशीर बाबी सदर प्राध्यापक उघड करीत आहेत असा संशय घेऊन मारहाण करणाऱ्या संस्थाचालक व त्यांचे सोबत मारहाण करण्यात सहभागी गुंडावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. तसेच सदर महाविद्यालयात चालणाऱ्या नियमबाह्य बाबी, भ्रष्टाचार इत्यादींची उच्चस्तरीय चौकशी करून संस्थेवर प्रशासक नियुक्तीची ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.