(रत्नागिरी)
शहरातील पॉलिटेक्निकच्या आवारामध्ये सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस कागदपत्र व आधार कार्ड तयार करीत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरीतील जागरूक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांनी उघडकीस आणला आहे.
शासनाकडून रत्नागिरीत चालविल्या जाणाऱ्या या कौशल्य विकास केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारचे घोटाळे होताना दिसून येत आहे. ज्यात विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचे काम सुरु आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावटी विद्यार्थ्याचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बनावट विद्यार्थ्यांना बसवण्यात येत आहे. या प्रकरणी “अभाविप”चे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी मंगळवारी हा प्रकार उघडकीस आणला.
‘अभाविप’ने स्थानिक पोलिसांकडे या बाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यानंतर शहर पोलिसांचे पथक कौशल्य विकास केंद्रात दाखल झाले होते. पोलिसांनी तेथे परीक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थिची माहिती संकलित केली आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.
या संदर्भात हॉटेल असोसिएशनचे कौस्तुभ सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडील कामगारांचे बनावट कागदपत्र बनवून व बनावट आधार कार्ड बनवून त्यांना परिक्षेला बसवल्याचेही पुढे आले आहे.
सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
‘अभाविप’च्या वतीने सुमीत पाध्ये यांनी रत्नागिरी ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी कौशल्य विकासच्या सातजणांविरोधात गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणात चौकशीसाठी काहींना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.