(संगमेश्वर / एजाज पटेल)
अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार शिक्षकांना असला तरी शिक्षा नेमकी काय करायची याचं तारतम्यही बाळगण्याची गरज असते. खरंतर शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांना मारण्याचीही सोय उरलेली नाही, असा थेट आरोप केला जातो. तर दुसरीकडे मात्र काही शिक्षक हे अजुनही अमानवी पद्धती वागत असल्याचे दिसून येते.
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर 1 येथे असाच एक खळबळजनक व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थ्यांने गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणुन संतापाचा पारा चढलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक असलेल्या मॅडमनी त्या मुलाला बेदम मारहाण केली. यात त्या विद्यार्थी मुलाच्या कानाला आणि डोळ्याला दुखापत झाल्याचा थेट आरोप मारहाण झालेल्या विध्यार्थ्यांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
रुद्र आनंद घवाळी हा नऊ वर्षीय मुलगा जिल्हा परिषद मराठी शाळा 1 नंबर मध्ये इयत्ता तिसरीत शिकत असून तो दि.4 एप्रिल रोजी शाळेत गेला होता. त्यावेळी शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका निलांजली चव्हाण यांनी त्याला गृहपाठ पूर्ण केला नाही. म्हणुन हाताने वळ उठेपर्यंत बेदम मारहाण केली. यात त्याच्या कानाला व डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याला जवळच्या आरोग्यकेंद्रात उपचार करावे लागले, तसेच पुढील तपासणीसाठी त्यांना बोलावण्यात आल्याचे रुद्र चे वडील आनंद घवाळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, सदर शिक्षिकेच्या बाबतीत या पूर्वी देखील मुलांच्या व पालकांच्या अनेक तक्रारी असून ग्रामस्थांसमोर सदर शिक्षिकेला समज देण्यात आली होती. तरी देखील त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी मुलांच्या डोक्यामध्ये पाटी मारून पाटी तुटेपर्यत प्रहार केलेला असून, एका विद्यार्थ्याला ‘वाळीत’ ठेवण्याची शिक्षा देखील केल्याचे निवेदनात नमूद करताना त्या मुलाशी वीस दिवस अन्य विद्यार्थ्यानी बोलायचे नाही, अशी अघोरी शिक्षा करून मुलांवर वाईट संस्कार करत असल्याचे नमूद केले आहे. या विषयाचा न्याय मिळत नाही तो पर्यत माझी दोन पाल्य या शाळेत शिक्षण घेत आहेत, त्यांना शाळेत पाठवणार नाही तसेच यामुळे होणाऱ्या माझ्या मुलांच्या शिक्षणिक नुकसानीस शिक्षिका निलांजली चव्हाण जबाबदार राहतील असा इशारा तालुका गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.