(संगमेश्वर)
महिलेकडील सोन्याचे, चांदीचे दागिने चोरून महिलेला पुलावरून नदीत टाकल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर गुहागरला जोडणाऱ्या भातगाव पुलावर २२ रोजी रात्री घडली. चोरट्याने तब्बल ४ लाखांचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन गणपत जोशी (२७, रा. पाणबुडी भातगाव, ता. गुहागर, सध्या रा. नालासोपारा, ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान भातगाव पुलावरून जात होत्या. त्याचवेळी नितीन जोशी याने महिलेला मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्याचवेळी त्याने महिलेकडील २,२५,००० रुपयांचे मंगळसूत्र, ५०,००० रुपयांचा सोन्याचा धातूचा हार, २० हजाराचे सोन्याचे टॉप, २० हजाराचे सोन्याचे झुमके, २० हजाराचे कानातील साखळ्या, ३० हजाराच्या दोन अंगठ्या, २५ हजाराची चेन, १० हजाराचे किरकोळ दागिने असा एकूण ४ लाखाचा ऐवज चोरला.
त्यानंतर जोशी याने महिला बेसावध असतानाच संशयित आरोपी नितीन जोशी याने त्यांना उचलून भातगाव पुलावरून खाली नदीत टाकले. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. याप्रकरणी महिलेने २३ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, संशयिताचा माग काढला जात आहे.