(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील राजे ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या शिवजयंतीनिमित्त राजे ग्रुप मालगुंड च्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राजे ग्रुपचे अध्यक्ष बाबा आग्रे आणि जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शिवज्योत दौड रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ला ते मालगुंड जोशीवाडी येथील शिवपुतळ्यापर्यंत काढण्यात आली. या शिवज्योत दौडमध्ये जय शिवाजी जय भवानी जय घोष करीत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शिवज्योत दौड आणण्यात आली.
यावेळी शिवज्योत दौड पाहणाऱ्या सर्वांनी राजे ग्रुपचे विशेष कौतुक केल्याने शिवज्योत दौड खास आकर्षण ठरली. त्यानंतर शिवजयंतीच्या उत्सवामध्ये सकाळ सत्रात शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक मालगुंड गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उप निरीक्षक क्रांती पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यानंतर राजे ग्रुपचे अध्यक्ष बावा आग्रे उपाध्यक्ष संजय दुर्गवळी, कार्याध्यक्ष निलेश भातडे, खजिनदार नितीन भातडे, सल्लागार वैभव पवार व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून पूजाअर्चा करण्यात आली.
शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जयगड पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांचेसह मालगुंड चे सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी, पोलीस पाटील अमोल राऊत व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते सुशील साळवी यांनी भेट देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून राजे ग्रुपच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या शिवजयंतीनिमित्त दुपार सत्रात फनी गेम्स स्पर्धा, महाप्रसाद, महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व सायंकाळच्या सत्रात मालगुंड येथील ग्रामपंचायत कार्यालय ते मालगुंड जोशीवाडी येथील शिवपुतळ्यापर्यंत भव्य दिव्य स्वरूपात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीत राजे ग्रुपच्या ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व लेझीमच्या तालावर सर्व सदस्य व महिला भगिनी सहभागी झाल्याने तसेच खास आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीत शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत बालकलाकार विराजमान झाल्याने ही रॅली विशेष आकर्षण ठरली.
रात्रीच्या सत्रात राजे ग्रुप साठी विशेष सहकार्य करणाऱ्या करणाऱ्या विविध व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी विचारपिठावर राजे ग्रुपचे अध्यक्ष बावा आग्रे, उपाध्यक्ष संजय दुर्गवळी, कार्याध्यक्ष निलेश भातडे, खजिनदार नितीन भातडे, सल्लागार वैभव पवार शाहीर सुनील लोगडे, युवा नेते साईनाथ जाधव, सेवानिवृत्त माजी कृषी अधिकारी विलास राणे, मालगुंडचे उपसरपंच संतोष चौगुले ,माजी ग्रामपंचायत सदस्य रोहित साळवी, संदीप देसाई गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, सामाजिक कार्यकर्ते सचिन दुर्गवळी, पत्रकार संदीप खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रात्री करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी येथील नमन मंडळाचा बहुरंगी नमन कार्यक्रम पार पाडला. हा नमन कार्यक्रम पाहण्यासाठी मालगुंड परिसरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी राजे ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य आणि महिला मंडळाने विशेष मेहनत घेतली.