( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील श्री राजे ग्रुपच्या वतीने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राजे ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे बारावे वर्ष साजरे करण्यात येणार असून बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मालगुंड जोशी वाडी या ठिकाणी असलेल्या शिवस्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व शिवपूजा, सकाळी दहा ते बारा या वेळेत फनी गेम्स स्पर्धा, दुपारी तीन वाजता महिला भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभ, दुपारी साडेचार वाजता ग्रामपंचायत मालगुंड ते मालगुंड जोशीवाडी येथील शिवाजी महाराज स्मारक परिसरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य दिव्य शोभा रॅली निघणार आहे. तसेच सायंकाळी सात वाजता विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ, सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत शिवजयंती उत्सवानिमित्त शिवचरित्रावर आधारित विशेष व्याख्यान आणि रात्री दहा वाजता करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये विविधाअंगी रेकॉर्ड डान्स असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आज 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवज्योत दौड रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ला ते मालगुंड जोशी वाडी येथील शिवपुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या शिवज्योत दौडमध्ये राजे ग्रुप चे सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत. एकूणच संपूर्ण शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी राजे ग्रुप च्यावतीने अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे.