(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मालगुंड गावातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने मालगुंड मराठवाडी येथील देवीच्या सहाणेवर असलेल्या अर्धाकृती शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर “जय शिवाजी जय भवानी”चा जयघोष करून शिवजयंतीचा जल्लोष साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मालगुंड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना व युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शिवसैनिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे कोतवडे जिल्हा परिषद गटाचे उप तालुकाप्रमुख प्रकाश जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी रोहित साळवी, साईनाथ जाधव, मालगुंडचे माजी सरपंच दीपक दुर्गवळी, माजी उपसरपंच संतोष चौगुले, बाबा आग्रे, विजय लिंगायत, योगेश साळवी, मंदार पांचाळ आदींसह अनेक शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.