(चिपळूण)
तालुक्यातील तळसरच्या जंगलात पट्टेवरी वाघाने तीन जनावरांची शिकार केली त्यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन्ही पट्टेरी वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातच होते. त्यामुळे तळसरच्या जंगलात कोणत्या वाघाने शिकार केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भागात तिसरा पट्टेरी वाघ असण्याची शक्यता पुढे आली आहे.
तालुक्यातील शिरगाव आणि तळसरच्या जंगलात २० डिसेंबरला तीन जनावरांची शिकार झाली. वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शिकारीची पद्धत आणि पायांचे ठसे यावरून ही शिकार पट्टेरी वाघानेच केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तळसरमधील जनावरांची शिकार झाली, त्या दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघ कुठे होते याची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता एक वाघ हा चांदोलीमध्ये तर दुसरा कोयनेच्या खोऱ्यात होता. म्हणजे या वाघांनी ती शिकार केली नसल्याचे समोर आले.
याबाबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना परिसरातील परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन पट्टेरी वाघ आहेत. दोन्ही वाघांवर कॅमेऱ्यातून लक्ष ठेवले जात आहे.
डिसेंबरमध्ये हे दोन्ही वाघ व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत होते. त्यामुळे शिरगाव आणि तळसरच्या जंगलात या वाघाने शिकार करण्याची शक्यता नाही. चिपळूण तालुक्यातील जंगलात कदाचित तिसऱ्या वाघाचाही वावर असू शकतो.
कोयनेच्या जंगलातून चिपळूण भागात यायचे झाल्यास खोल दरीत यावे लागेल आणि जाताना पुन्हा या दऱ्यातून जावे लागेल. त्यामुळे वाघच नव्हे तर अन्य कोणताही वन्यप्राणी या दऱ्या पार करून चिपळूणातून कोयनेत येऊ शकत नाही. या भागात अन्य कुठे शिकार झाली आहे का, झाली असेल तर ती कोणत्या प्राण्याने केली याचा शोध घेण्याची गरज आहे.
– संग्राम गोडसे, परिक्षेत्र वन अधिकारी, कोयना
तिसऱ्या वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले तर आनंदच आहे. चिपळूण तालुक्यातील जंगल क्षेत्र असलेल्या भागात वाघाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. आणखी २५ अतिरिक्त कॅमेऱ्याऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.
– सरवर खान, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण